कर्नाटकातील शिक्षकांसाठी ऐतिहासिक शासन निर्णय
कर्नाटक: राज्यातील सर्व सरकारी, खासगी शिक्षक तसेच विविध क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवा बजावणाऱ्यांसाठी कर्नाटक सरकारने शिक्षक दिनानिमित्त एक ऐतिहासिक आणि सन्मानाचा निर्णय घेतला आहे . या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे . या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील सुमारे साडेचार लाख शिक्षकांना होणार आहे.
डॉक्टर (Dr.), वकील (Adv.), इंजिनिअर (Er.) किंवा प्रोफेसर (Prof.) यांसारख्या इतर प्रतिष्ठित व्यावसायिकांप्रमाणेच शिक्षकी पेशालाही समाजात समान सन्मान, ओळख आणि प्रतिष्ठा मिळावी या उद्देशाने आता शिक्षकांना (टीचर) टीआर/Tr हा उपसर्ग लावू शकतील. सरकारने 5 सप्टेंबर शिक्षक दिनी यासाठी कॅबिनेटच्या मंजुरीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी विजयनगर जिल्ह्यातील कुडलिगी येथे आयोजित ‘प्रजा सेवा अभियानात’ बोलताना दिली.
डॉक्टर (Dr.), इंजिनिअर (Er.) आणि प्रोफेसर(Prof) यांच्याप्रमाणेच शिक्षकांनाही समाजात एक विशेष ओळख आणि सन्मान मिळावा, या उद्देशाने शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
“आई-वडील आपल्याला जन्म देतात, परंतु शिक्षक योग्य मार्ग दाखवून आपल्याला शिक्षित बनवतात. शिक्षण क्षेत्रातील ही सेवा ईश्वराच्या पूजेसारखीच आहे.”
नावाआधी लावले जाणारे ‘टीआर’ हे केवळ दोन अक्षरे नसून, ते मुलांच्या भविष्यासाठी आणि समाजासाठी समर्पित केलेल्या आयुष्याचे प्रतीक आहे. या निर्णयामुळे शिक्षकांचा आत्मसन्मान वाढेल आणि समाजात त्यांच्याबद्दलची आदराची भावना अधिक दृढ होईल.’जो समाज आपल्या शिक्षकांचा सन्मान करतो, तो आपल्या भविष्याचा सन्मान करतो,’ असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

श्री. बी बी. चापगावकर
प्रधान कार्यदर्शी,कर्नाटक प्राथमिक शिक्षक संघटना बेंगळुरू घटक खानापूर
नावामागे ‘टीआर’ लावल्याने आमचा आत्मसन्मान नक्कीच वाढला आहे, पण सोबतच आमची समाजाप्रती असणारी जबाबदारीही द्विगुणीत झाली आहे. मुलांचे भविष्य घडवताना अधिक निष्ठेने आणि नैतिकतेने काम करण्याची प्रेरणा या निर्णयामुळे आम्हाला मिळेल.”आजच्या काळात शिक्षकी पेशाकडे बघण्याचा कल काहीसा कमी होत असताना, अशा ऐतिहासिक निर्णयामुळे या क्षेत्राला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. यामुळे नवोदित आणि तरुण पिढीलाही अभिमानाने शिक्षक क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळेल.”कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे राज्यातील सुमारे साडेचार लाख शिक्षकांनी मनापासून स्वागत केले असून, इतर राज्यांनीही अशा प्रकारचा सन्मान शिक्षकांना द्यावा. असे मत बी.बी चापगावकर( प्रधान कार्यदर्शी,कर्नाटक प्राथमिक शिक्षक संघटना बेंगळुरू घटक खानापूर ) यानी व्यक्त केले.





