बाप्पाच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न! खानापुरची स्थीती


बाप्पाच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न! खानापुरची स्थीती

हेस्कॉम ते मलप्रभा पुलादरम्यानचा रस्ता दुरुस्तीची काँग्रेस ची मागणी :अन्यथा उग्र आंदोलन व उपोषणाचा इशारा

खानापूर:खानापूर शहरातील हेस्कॉम (HESCOM) ऑफिस आणि फिश मार्केटपासून मलप्रभा नदीवरील पुलापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या धोकादायक रस्त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस आणि नागरिकांच्या वतीने खानापूर सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) देण्यात आले.

गणेशमूर्तींच्या वाहतुकीस अपघात व धोक्याची शक्यता:

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या रस्त्यावरून मोठ्या आणि घरगुती गणेशमूर्तींची ने-आण केली जाते. मात्र, रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहने उलटून अपघात होण्याची किंवा गणेशमूर्तींना हानी पोहोचण्याची तीव्र शक्यता व्यक्त केली जात आहे. वादग्रस्त जागा वगळून, जुन्या वहिवाटीच्या रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करण्यासाठी तात्पुरती का होईना, आठ दिवसांत डागडुजी करून रस्ता सुरळीत करावा, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. “नदीवरील पूल नेमका कोणत्या रस्त्यासाठी बांधला होता, याचा विचार पीडब्ल्यूडी खात्याने करावा. या रस्त्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची वेळ आली आहे,” असा संतापही ग्रामस्थांनी व्यक्त केला.

उग्र आंदोलन आणि लोकायुक्त केसचा इशारा

येत्या गणेश चतुर्थीच्या आत रस्त्याची डागडुजी न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निलावडे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष तसेच माजी ग्रामपंचायत युनियन अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी दिला आहे. याशिवाय, रस्ता वेळेत दुरुस्त न झाल्यास संबंधित विभागावर ‘लोकायुक्त’मध्ये तक्रार दाखल करून पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

वकील संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाहणी

निवेदन देण्यापूर्वी खानापूर तालुका वकील संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली. या वेळी वकील संघटनेचे अध्यक्ष आय आर घाडी, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिरजे, राजेश पाटील (माजी अध्यक्ष, शेंदोळे ग्रामपंचायत)वेंकट गावडे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून, बाहेरील राज्यातून व तालुक्यातून येणाऱ्या भाविक-पर्यटकांची सोय व्हावी यासाठी तात्काळ रस्ता दुरुस्तीची विनंती केली.

“लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतलेय का?”

रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था आणि ये-जा करणाऱ्या पर्यटकांचे होणारे हाल पाहून “खानापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतले आहे का?” असा संतप्त सवाल अ‍ॅड. ईश्वर घडी यांनी यावेळीउपस्थित केला.


108
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!