
उद्या प्राथमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सभा
पाच महत्त्वाचे विषय अजेंड्यावर; सभासदांचे लक्ष निर्णयांकडे
खानापूर : दि. खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., खानापूरची सन २०२५-२६ सालची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सरकारी आदर्श मराठी शाळा, चिरमूर गल्ली, खानापूर येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.नेहमी वादाच्या असणारी शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा यंदा तरी शांततेत पार पडेल का याकडे शिक्षकांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे
सोसायटीच्या नोटीसमध्ये वार्षिक सभेसाठी पाच प्रमुख विषय ठेवण्यात आले आहेत. मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन, सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकाला मंजुरी, सन २०२६-२७ च्या ऑडिटसाठी ऑडिटरची नियुक्ती, नोकर पगारवाढीबाबत चर्चा तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयांवर चर्चा होणार आहे.
याशिवाय सभासदांसाठी काही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. सन २०२५-२६ मध्ये दहावी परीक्षेत ९० टक्के, बारावी परीक्षेत ८५ टक्के आणि पदवी, डिप्लोमा, डी.एड., बी.एड. अंतिम परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांना प्रोत्साहनपर बक्षिसासाठी २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत लेखी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच तीन वर्षांपासून लाभांश न घेणाऱ्या सभासदांचा लाभांश राखीव निधीत जमा करण्याची तरतूद, सभासदांनी आपले ओळखपत्र अद्ययावत करण्याबाबतची सूचना आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी उपस्थित राहण्याबाबतही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पगारवाढीचा विषय आणि इतर महत्त्वाचे मुद्दे सभेत चर्चेला येणार असल्याने शिक्षक सोसायटीची ही वार्षिक सभा लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. सभेत कोणते निर्णय होतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
नियम
जे सभासद ३ वर्षांपर्यंत आपला लाभांश (डिव्हिडंड) घेऊन जात नाहीत, त्यांचा लाभांश राखीव निधी (रिझर्व्ह फंड) मध्ये जमा करण्यात येईल.
ज्या सभासदांनी सोसायटीतून आपले ओळखपत्र घेतलेले नाही, त्यांनी दि. २३-०९-२०२६ पर्यंत स्वतःचे ३ आय.डी. साईज फोटो सोसायटीमध्ये देऊन आपले ओळखपत्र घेऊन जावे.
ओळखपत्राशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभेला हजर राहता येणार नाही.
सभासदांनी आपल्या नाव, पत्ता, शाळा, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक यामध्ये बदल झाल्यास सोसायटीला लेखी कळवावे.
कोरमअभावी सभा तहकूब झाल्यास, त्याच दिवशी, त्याच ठिकाणी एक तासाने उपस्थित असलेल्या सभासदांच्या उपस्थितीत सभा घेण्यात येईल. त्यावेळी कोरमचा विचार केला जाणार नाही.
असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एम व्हि कुंभार यांनी केले आहे.
Advertise….


