गुरुजींच्या खिशावर सरकारची नजर!
वर्षा कुंभार:राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या ‘कर्तव्य’ ॲपमध्ये आता शिक्षकांनाही रोख रकमेची दैनंदिन नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शाळेत पोहोचल्यानंतर ऑनलाईन उपस्थिती नोंदवताना स्वतःकडील कॅश रकमेची माहिती भरावी लागत असल्याने शिक्षक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
मुळात हे ‘कर्तव्य’ ॲप राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आले आहे, ज्यामध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. या ॲपद्वारे हजेरीसह अनेक कार्यालयीन बाबी ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्येच कॅश रजिस्टरबरोबरच हालचाल रजिस्टरची सुविधाही देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयात ज्याप्रमाणे रोखीच्या व्यवहारांची नोंद कॅश रजिस्टरमध्ये आणि कर्मचाऱ्यांच्या बाहेरील कामांची नोंद हालचाल रजिस्टरमध्ये केली जाते, त्याच धर्तीवर ॲपमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षकाला शाळेच्या कामासाठी बाहेर जावे लागल्यास त्याची नोंद आणि दिवसभर बाहेर राहिल्यास ओओडीची नोंद तसेच रजेची नोंदही या ॲपवर करता येणार आहे.
मात्र, शिक्षकांचे मुख्य कार्य हे विद्यार्थ्यांना शिकवणे असताना त्यांच्यावर कॅश रजिस्टर भरण्याची जबरदस्ती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिक्षकांकडे शाळेच्या आर्थिक व्यवहारांची किंवा रोख रक्कम हाताळण्याची कोणतीही जबाबदारी नसते. त्यामुळे त्यांच्याकडे शासकीय पैसा येण्याचा संबंधच नसताना दररोज ही नोंद करण्याची गरज काय, असा मुद्दा शिक्षक मांडत आहेत. त्यामुळे ही अट रद्द करून शिक्षकांना यातून सूट द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या अतिरिक्त नोंदींमुळे शिक्षकांच्या अध्यापनाच्या कामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांसाठी असलेल्या या ॲपचा वापर शिक्षकांसाठी केवळ अत्यावश्यक नोंदींपुरताच मर्यादित ठेवावा, अशी आग्रही मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.
Advertise….





