‘शतपर्व’! एक भावनिक स्मृतिप्रवास:ॲड.अभिजीत सरदेसाई 


‘शतपर्व’! एक भावनिक स्मृतिप्रवास:ॲड.अभिजीत सरदेसाई 

चापगाव : शतपर्व’ हे केवळ स्मरणिकेचे नाव नसून शाळेच्या शंभर वर्षांच्या प्रवासातील विविध पर्वांचा सांस्कृतिक आणि भावनिक दस्तऐवज आहे. बदलत्या शैक्षणिक प्रवाहासोबत शाळेने समाजात बजावलेली भूमिका, शिक्षकांचे ज्ञानदान, माजी विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रांतील कामगिरी आणि ग्रामस्थांचे योगदान या स्मृतिप्रवासातून अधोरेखित होते. असे प्रतिपादन ॲड. अभिजीत सरदेसाई यांनी केले.

चापगाव येथील उच्च प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘शतपर्व’ स्मरणिकेचे पुनर्प्रकाशन व लोकार्पण सोहळा मंगळवारी, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेच्या शंभर वर्षांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

शाळेने शंभर वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक पिढ्यांना शिक्षण आणि संस्कार देत समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये विविध उपक्रमांनी साजऱ्या झालेल्या शताब्दी महोत्सवाच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्याच्या उद्देशाने ‘शतपर्व’ ही विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.

माजी विद्यार्थी, शिक्षकांच्या आठवणींना उजाळा

कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, ग्रामस्थ आणि मान्यवर एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाळेच्या प्रांगणात जुन्या आठवणी, शाळेतील संस्कार आणि विद्यार्थी जीवनातील अनुभवांना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण झाले.

यावेळी श्री. संजय कुबल, श्री. ज्योतिबा प्रल्हाद रेमाणी, ॲड. अभिजीत सरदेसाई, श्री. किसनराव गोदी बेळगावकर, श्री. सयाजी पाटील, श्री. मल्लाप्पा मारीहाळ, श्री. रमेश धबाले, श्री. मुकुंद तुकाराम पाटील, श्री. नारायण गोविंद देसाई आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. मष्णू मारुती चोपडे यांनी शाळेच्या शताब्दी महोत्सवामुळे माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ झाल्याचे सांगितले.

योगदान देणाऱ्यांचा सन्मान

शाळेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. कॅप्टन चांगाप्पा पाटील, सुभेदार शाहू पाटील, सुभेदार नागेश बेळगावकर, शिक्षक गोविंद पाटील, महेश कवळेकर, यल्लाप्पा कुकडोळकर, विलास पाटील तसेच मराठी व कन्नड माध्यमांच्या दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्मरणिकेची आकर्षक मांडणी, सजावट आणि अक्षरजुळणीसाठी विशेष प्रयत्न करणारे श्री. सुनील पाटील तसेच पत्रकार श्री. चेतन लक्केबैलकर आणि श्री. गोविंद पाटील यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!