विद्यार्थ्यांआधी शिक्षकांचा अभ्यास! शिक्षण खात्याचा सहा महिन्यांचा  प्लॅन


विद्यार्थ्यांआधी शिक्षकांचा अभ्यास! शिक्षण खात्याचा सहा महिन्यांचा  प्लॅन

वर्षा कुंभार: खानापूर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये शिक्षकाची भूमिका निर्णायक असल्याने त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या गरजेनुसार शिकवण्याची पद्धत अवलंबणे आणि शिक्षण प्रक्रिया सुलभ व परिणामकारक करणे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यावर या उपक्रमात भर दिला जाणार आहे. या सहा महिन्यांच्या कार्यक्रमामुळे शिक्षकांना स्वतःच्या अध्यापन शैलीचे आत्मपरीक्षण करून नवी कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत.

राज्यातील शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्याच्या हेतूने हा सेतूबंध कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून शिक्षकांना अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक ते शैक्षणिक मार्गदर्शन पुरवले जाणार आहे.

सध्या शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदल घडत आहेत. त्यामुळे शिक्षकांकडे अद्ययावत ज्ञान, आधुनिक अध्यापन तंत्रे आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण देण्याच्या पद्धतींचे ज्ञान असणे गरजेचे झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सेतूबंध कार्यक्रमाद्वारे शिक्षकांच्या व्यावसायिक क्षमतांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे शिक्षक आणि अध्यापन प्रक्रियेसाठी लागणारे ज्ञान व कौशल्ये यांच्यामधील अंतर कमी करणे हा आहे. अध्यापनाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक प्रभावी बनवणे आणि शिक्षकांना आवश्यक कौशल्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे, याला या कार्यक्रमातून बळ मिळणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाची अंमलबजावणी कशी केली जाईल, प्रशिक्षणाचे स्वरूप काय असेल, शिक्षकांचा सहभाग कसा असेल आणि सहा महिन्यांचे नियोजन कसे असेल, याबाबतची सविस्तर माहिती अधिकृत परिपत्रकाद्वारे लवकरच कळवण्यात येणार आहे.


106
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!