
कुसमळी प्रकल्प, भ्रष्टाचार, अन् भाजपचा श्रेयवाद! डॉ. निंबाळकरांची उद्या पत्रकार परिषद
सर्वच राजकीय पक्षांचे, नेतेमंडळींचे आणि जनतेचे उत्सुकतेने लक्ष लागून
खानापूर: राजू कुंभार
खानापूर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल करण्यासाठी तसेच पक्षाचे जनहितासाठी कार्य लोकांपर्यंत पोहचविण्या साठी एआयसीसी (AICC) सचिव व माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पीडब्ल्यूडी आयबी (PWD IB) येथे ही पत्रकार परिषद पार पडणार असून, यामध्ये त्या तालुक्यांतील अनेक संवेदनशील आणि वादग्रस्त मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार टीकास्र सोडण्याची शक्यता आहे. तसेच तालुका समितीची वेळोवेळी बदलणारी भूमिका यावरही त्या बोलण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील शेती आणि पाण्याचा प्रश्न ठरलेल्या कुसमळी प्रकल्पाबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांची संशयास्पद भूमिका हा या पत्रकार परिषदेत कळीचा मुद्दा ठरणार आहे. यासोबतच, शहरांतर्गत महामार्गाचा रखडलेला प्रश्न आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या फिश मार्केटचा विषय उकरून काढत त्या सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची चिन्हे आहेत.
भाजपच्या श्रेयवादावर आणि भ्रष्टाचारावर ओढणार आसूड,राम मंदिर चोरीची घटना त्यावर तालुक्यातील भाजप आणि त्यांच्या सम विचारी संघटनांची भूमिका, श्रेयवाद लाटण्यासाठी तालुका भाजपने सुरू केलेले राजकारण यावर डॉ. निंबाळकर थेट आसूड ओढण्याची शक्यता आहे. याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागातील संपर्क रस्त्यांची उडालेली दयनीय अवस्था,
प्रशासकीय कार्यालयांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य जनतेची होणारी अडवणूक,तसेच तालुक्यातील इतर महत्त्वाच्या दुर्लक्षीत मुद्द्यांवर त्या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहेत.
डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या अचानक ठरलेल्या पत्रकार परिषदे मुळे खानापूर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्याच्या या ‘वादळी’ पत्रकार परिषदेकडे तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे, नेतेमंडळींचे आणि जनतेचे उत्सुकतेने लक्ष लागून राहिले आहे.




