आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा
चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहासाठी दोन एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, वसतिगृहाच्या नवीन इमारतीसाठी आता महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
चंदगड येथील हे वसतिगृह गेल्या सुमारे २५ वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरू आहे. विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि वसतिगृहाला स्वतःची प्रशस्त इमारत असावी, यासाठी मागील काही वर्षांपासून विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू होता. सामाजिक संघटनांकडूनही या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर आमदार शिवाजीराव पाटील यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेत संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या निर्देशानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय जागेचा प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया गतिमान झाली.
चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. वसतिगृहासाठी जागा निश्चित झाल्याने भविष्यात प्रशस्त इमारत, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा तसेच शैक्षणिक वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
चाळोबा मंदिर परिसरातील गट क्रमांक ५११/४ मधील दोन एकर जमीन वसतिगृहासाठी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे, तत्कालीन तहसीलदार विनोद रणवे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जागा उपलब्ध झाली. सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, कोल्हापूर यांनी जागा मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या नावावर अधिकृत केली आहे.
या निर्णयामुळे चंदगडमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.




