घाळींच्या विचारांचा वारसा, कोरेंच्या कार्याचा गौरव.


पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांना ‘डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार’; शिक्षण, आरोग्य सामाजिक व सहकार क्षेत्रातील समाजसेवेतील योगदानाचा सन्मान.

उपसंपादक: श्री.स्वप्निल कुंभार (चंदगड,आजरा, गडहिंग्लज)

गडहिंग्लज : विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लजचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. एस. एस. घाळी यांच्या ३९ व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. घाळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे के. एल. ई. संस्थेचे संस्थापक व पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. प्रभाकर कोरे यांना ‘डॉ. घाळी समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

प. पू. पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आतापर्यंत विविध समाजातील सामाजिक व इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवळपास २८ कर्तृत्ववान व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्काराची २५ हजार रुपयांची रक्कम डॉ. प्रभाकर कोरे यांनी पुन्हा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्याकडे सुपूर्द केली. या रकमेतून गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक मदत द्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

डॉ. घाळी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दत्ता पाटील यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांचा जीवनप्रवास व कार्याचा परिचय करून दिला. ज्ञान, माणुसकी आणि गुणवान चारित्र्य यांचा सुंदर संगम म्हणजे पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थेचे जॉइंट सेक्रेटरी श्री. गजेंद्र बंदी यांनी विद्या प्रसारक मंडळाच्या कार्याचा आढावा सादर केला. “कै. डॉ. घाळी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांचे विशाल कर्तृत्व आजही गडहिंग्लज पंचक्रोशीतील जनमानसात कायम आहे “असे त्यांनी सांगितले.

 पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांनी १९१५ साली स्थापन झालेल्या के. एल. ई. संस्थेच्या विकासाचा प्रवास मांडला. आज संस्थेच्या ३२२ संस्था कार्यरत असून दोन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातही संस्थेने मोठे योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी शिक्षणाच्या क्षेत्रात जातीनुसार शिक्षण घेण्यावर भर दिला जात होता; मात्र ही व्यवस्था बदलून सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम संस्थेने केल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सतीश घाळी यांनी “कै. डॉ. घाळी आणि पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांच्या शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य व समाजाच्या उन्नतीविषयीच्या विचारांमध्ये विलक्षण साम्य असल्याचे सांगितले.” डॉ. कोरे यांच्या कार्याला विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने सलाम करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी यांनी मनोगत व्यक्त केले,

या प्रसंगी संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य शिबिरे, अॅक्युपंक्चर शिबिरे, रक्तदान शिबिरांसह विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. या उपक्रमांचा विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच नागरिकांनी लाभ घेतला.

कार्यक्रमास विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी, उपाध्यक्ष अरविंदअण्णा कित्तूरकर, प. पू. पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी, सचिव बाबुराव भोसकी सर, सहसचिव श्री. गजेंद्र बंदी, संचालक डॉ.एस एम कोल्हापूरे, संचालक अॅड. विकासअण्णा पाटील, संचालक किशोर हंजी, सचिव बाबुराव भोसकी यांच्यासह संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी यांनी मनोगत व्यक्त केले तर संस्थेचे सचिव बाबुराव भोसकी सर यांनी आभार मानले. 


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!