सामाजिक कार्याची दखल घेत ‘सोशल वर्क अँड सोशल वेल्फेअर’ विषयात डॉक्टरेट; पुण्यात झाला गौरव सोहळा.
चंदगड : श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड गावचे सुपुत्र तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन सदानंद बल्लाळ यांच्या कार्याचा शैक्षणिक क्षेत्रातून गौरव झाला आहे. समाजकार्य आणि समाजकल्याणाच्या क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना ‘सोशल वर्क अँड सोशल वेल्फेअर’ या विषयातील डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या सामाजिक वाटचालीत आणखी एक मानाचा टप्पा जोडला गेला आहे.
सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. ग्लोबल पीस कौन्सिल आणि इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स अॅम्बेसिडर ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन डे कार्यक्रमात बल्लाळ यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
अविनाश डी. सकुंडे यांच्या हस्ते हा पदवी प्रदान सोहळा पार पडला. कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात आला.
ग्रामीण खेडे तील प्रश्नांशी नाते
जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना बल्लाळ यांनी ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. गावपातळीवरील विकासकामे, नागरिकांच्या अडचणी आणि सामाजिक प्रश्न याबाबत त्यांनी पाठपुरावा केला. युवकांशी संवाद साधत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांनी सहभाग घेतला.

कार्याची शैक्षणिक पातळीवर नोंद
सामाजिक क्षेत्रात सातत्याने केलेल्या कार्याची डॉक्टरेटच्या माध्यमातून झालेली दखल हा त्यांच्या कामाचा विशेष गौरव मानला जात आहे. या सन्मानामुळे चंदगडच्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सचिन बल्लाळ यांच्या नावाला नवी ओळख मिळाली असून, आता ते ‘डॉ. सचिन सदानंद बल्लाळ’ म्हणून ओळखले जाणार आहेत.


