सामाजिक भान जपणारा खानापूरचा ‘रीलस्टार’!
रुग्णवाहिका चालक ते सोशल मीडिया स्टार असा प्रेरणादायी प्रवास
खानापूर : राजू कुंभार
सोशल मीडियाच्या झगमगत्या दुनियेत सध्या रील्सचा अक्षरशः बोलबाला आहे. काही सेकंदांच्या व्हिडिओतून प्रसिद्धी मिळविण्याच्या स्पर्धेत अनेक चेहरे दररोज नव्याने समोर येत आहेत. अधिकाधिक लाइक्स, फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स मिळविण्याच्या नादात कधी अंगप्रदर्शन, कधी अश्लील आशय, तर कधी केवळ दिखाऊपणाला प्राधान्य दिले जाते. मात्र, या गर्दीत मनोरंजनासोबत सामाजिक भान जपणारे चेहरे तुलनेने विरळच.
याच वेगळ्या वाटेवर स्वतःची ओळख निर्माण करणारे खानापूर शहरातील घाडी गल्लीचे देवाप्पा घाडी उर्फ ‘कॉमेडी देव’ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. विनोदाची सहज शैली, नैसर्गिक अभिनय आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांकडे पाहण्याची संवेदनशील नजर यामुळे त्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
म्हाताऱ्याच्या भूमिकेतून मराठी शाळांचा प्रश्न ऐरणीवर

नुकत्याच त्यांच्या एका इंस्टाग्राम रीलने विशेष लक्ष वेधून घेतले. सीमाभागातील बंद पडत चाललेल्या मराठी शाळा, पालकांची बदलती मानसिकता आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढणारा ओढा या गंभीर विषयावर त्यांनी एका वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली.विशेष म्हणजे, कोणताही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत सहज आणि नैसर्गिक अभिनयातून त्यांनी हा विषय मांडला. साध्या भाषेत मांडलेल्या या रीलमधून मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न आणि बदलत्या शैक्षणिक प्रवाहावर भाष्य करण्यात आले. या रीलला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी लाइक्स आणि प्रतिक्रियांच्या माध्यमातून त्यांचे कौतुक केले.
हसवता हसवता एखादा गंभीर प्रश्न लोकांसमोर ठेवण्याची त्यांची ही शैलीच ‘कॉमेडी देव’ला इतर रीलस्टारपेक्षा वेगळे ठरवते.
रुग्णवाहिकेच्या सायरनपासून सोशल मीडियाच्या पडद्यापर्यंत…
देवाप्पा घाडी यांचा प्रवासही तितकाच रंजक आहे. खानापूर नगरीत जन्मलेल्या देवाप्पा यांचे बालपण साध्या आणि कष्टकरी वातावरणात गेले. सध्या ते बेळगाव येथील एका रुग्णालयात रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत आहेत.रुग्णवाहिका चालवताना त्यांनी आयुष्यातील अनेक गंभीर प्रसंग जवळून पाहिले. रुग्णांचे दुःख, नातेवाईकांची धावपळ आणि संकटाच्या क्षणी माणसांची होणारी अवस्था याचा त्यांना जवळून अनुभव आला. या अनुभवातूनच लोकांच्या चेहऱ्यावर काही क्षण का होईना, हसू फुलवावे, या भावनेतून त्यांनी सोशल मीडियावर रील्स करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला मनोरंजनासाठी सुरू झालेला हा प्रवास पाहता पाहता त्यांची नवी ओळख बनला.
कॉमेडी देव’ नावाची स्वतंत्र ओळखआपल्या निखळ विनोदी शैलीमुळे देवाप्पा घाडी यांना सोशल मीडियावर ‘कॉमेडी देव’ म्हणून ओळख मिळाली. दैनंदिन जीवनातील प्रसंग, गावाकडची बोली, सामान्य माणसांचे स्वभाव आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना विनोदी अंगाने मांडण्याची त्यांची हातोटी प्रेक्षकांना भावली.या प्रवासात त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढत गेली. विशेष म्हणजे, फॉलोअर्सच्या पलीकडे त्यांनी एक मोठा मित्रपरिवार निर्माण केला.
प्रसिद्धी समाजसेवेकडे वळविण्याचा प्रयत्न
सोशल मीडिया केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग समाजोपयोगी कामासाठी करता यावा, या उद्देशाने देवाप्पा घाडी यांनी ‘आपलं खानापूर, आपली माणसं’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे.खानापूर तालुक्यातील गरजू नागरिकांना मदतीचा हात मिळावा, त्यांच्या समस्या योग्य ठिकाणी पोहोचाव्यात आणि शक्य त्या माध्यमातून मदत उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.सोशल मीडियातून मिळालेली लोकप्रियता पुन्हा समाजासाठी वापरण्याचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरत आहे.
रील्सच्या पडद्यामागे कुटुंबाचीही मेहनत
देवाप्पा यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचीही महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या पत्नी रील्समध्ये त्यांच्यासोबत अभिनय करतात, तर त्यांचा मुलगा कॅमेऱ्यामागची जबाबदारी सांभाळतो. मोबाईलच्या माध्यमातून रील्सचे चित्रीकरण करण्यापासून ते त्याच्या निर्मितीपर्यंत कुटुंबातील सदस्यांची साथ मिळते.त्यामुळे ‘कॉमेडी देव’च्या या प्रवासामागे एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाच्या एकत्रित प्रयत्नांची कहाणी आहे.
‘सरकार ग्रुप’चीही खंबीर साथ
देवाप्पा यांच्या सामाजिक कार्याला इदलहोंड येथील ‘सरकार ग्रुप’चे अध्यक्ष शंकर पाखरे यांची साथ लाभत आहे. मित्रपरिवाराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना अधिक व्यापक करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
स्टारडमच्या झगमगाटात माणुसकीचा प्रकाश…
सोशल मीडियावर प्रसिद्ध होणे ही आज अनेकांची इच्छा आहे. मात्र, प्रसिद्धीच्या या झगमगाटात समाजातील प्रश्नांकडेही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणारे देवाप्पा घाडी यांचा प्रवास वेगळा आहे.मनोरंजन, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणाऱ्या या खानापूरच्या ‘रीलस्टार’च्या पुढील वाटचालीकडे आता अनेकांचे लक्ष लागले आहे.
देवाप्पा घाडी यांच्या या सामाजिक आणि कलात्मक प्रवासाला ‘ग्रामदूत’ परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
Advertise



