चंदगड, आजरा नंतर आता गडहिंग्लजलाही दुष्काळी सवलती द्या!


मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांना मदतीचे कवच मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे.

 गडहिंग्लज प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार

              राज्य शासनाने २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. या निर्णयामुळे बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना १२ विविध शासकीय सवलती व मदतीचा लाभ मिळणार आहे. घोषित करण्यात आलेल्या यादीत चंदगड मतदारसंघातील चंदगड आणि आजरा या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

​               आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंदगड व आजरा तालुक्यातील बळीराजाला दिलासा देण्यास यश आल्याची भावना आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केली. मात्र, सध्याची पावसाची तूट आणि निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता, गडहिंग्लज तालुकाही दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळे या तालुक्याला दुष्काळसदृश सवलतींपासून वंचित ठेवणे अयोग्य ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.

“​गडहिंग्लज तालुक्यातील बळीराजाला संकटाच्या काळात आधार देणे आणि मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांना शासकीय मदतीचे कवच मिळवून देणे ही आपली प्राथमिकता असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने पत्र पाठवले असून, लवकरच त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गडहिंग्लजचा समावेश करण्याची आग्रही मागणी करणार असल्याचे सांगितले.”

​चंदगड आणि आजरा तालुक्यांप्रमाणेच गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांनाही शासकीय सवलतींचा लाभ मिळणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाच्या अभावामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. प्रशासनाने स्थानिक परिस्थितीचा सखोल आढावा घेऊन गडहिंग्लज तालुक्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे. 


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!