बुक्कीहाळची अल्पवयीन मुलगी घरी परतली
चंदगड : प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील बुक्कीहाळ येथून बेपत्ता झालेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी अखेर घरी परतली आहे. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षे ८ महिने, वय असलेली सदर मुलगी दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी घरात कोणालाही काहीही न सांगता बेळगाव येथे गेली होती. ती बेळगाव येथील डी-मार्टमध्ये नोकरी करण्याच्या उद्देशाने गेल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, आंबेवाडी, ता. जि. बेळगाव येथील तिची मैत्रीण सोबत चार दिवस राहिली. त्यानंतर आज ती आपल्या वडिलांसोबत घरी परतली. तिचे वडील शंकर पाटील यांनी तिला चंदगड पोलीस ठाण्यात हजर केले.
पोलीस ठाण्यात तिचा सविस्तर लेखी जबाब नोंदविण्यात आला. तिने आपणास कोणीही फूस लावून पळवून नेले नसल्याचे सांगितले. तसेच तिच्यासोबत कोणत्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक गैरप्रकार घडला नसल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.
आपण स्वतःच्या इच्छेने कामाच्या शोधासाठी बेळगाव येथे गेलो होतो आणि या प्रकरणात कोणाविरुद्धही आपली कोणत्याही प्रकारची तक्रार नसल्याचे स्नेहाने आपल्या जबाबात नमूद केले आहे. तिच्या जबाबानंतर पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


