चंदगड येथे बेडरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या तरुणाचा मृत्यू


चंदगड ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच मृत्यू; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू.

 चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

चंदगड ते चंदगडफाटा मधील पप्पू कॉलनी येथील एका घरातील बेडरूममध्ये ३४ वर्षीय तरुण बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर त्याला तातडीने चंदगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सोहेल शहाबुद्दीन नाईक (वय-३४) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी सोहेल आपल्या बेडरूममध्ये झोपला होता. कुटुंबीयांनी त्याला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोलीचा दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता सोहेल खोलीत बेशुद्धावस्थेत पडलेला दिसून आला.

कुटुंबीयांनी वेळ न दवडता त्याला तातडीने चंदगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. घटनास्थळी काही औषधे व गोळ्या आढळल्याची माहिती समोर आली असली, तरी त्यांचा मृत्यूशी नेमका काय संबंध आहे? याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

सोहेल गेल्या काही काळापासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती कुटुंबीयांकडून मिळाली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या घटनेची नोंद चंदगड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस हवालदार राजगिरे पुढील तपास करीत आहेत.

सोहेल हा माजी पंचायत समिती सदस्य शहाबुद्दीन नाईक यांचा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व दोन बहिणी असा परिवार आहे. तरुणाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!