नियम मोडाल तर कारवाई होणारच!


चंदगडमध्ये गणेशोत्सव समन्वयक बैठकीत पोलीस निरीक्षक एन. आर. चोखंडे यांचा मंडळांना इशारा.

चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

        आगामी गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडावा, यासाठी चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव समन्वयक बैठकीचे आयोजन करण्यात आले. मंदिराशेजारील सभागृहात झालेल्या या बैठकीस तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, डॉल्बी चालक-मालक, मंडप डेकोरेटर्स, पोलीस पाटील, पत्रकार तसेच सजग नागरिक उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना चंदगडचे पोलीस निरीक्षक एन. आर. चोखंडे यांनी गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना शासन व पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. “चालू वर्षाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा. डॉल्बीचा अतिरेक, मादक पदार्थ, मटका तसेच इतर गैरप्रकारांपासून दूर राहावे. गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना किंवा गैरवर्तन घडल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई होणारच,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

गणेश मंडळांनी उत्सवासाठी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असून, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते किंवा गणेशमूर्तीवर सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने असतात, अशा ठिकाणी CCTV कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे चोखंडे यांनी सांगितले. महाप्रसादाचे आयोजन करण्यासाठीही आवश्यक परवानगी घ्यावी. गणेश मंडळांमुळे वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच गणपतीची स्थापना ज्या जागेवर होणार आहे, त्या जागेच्या मालकाचे परवानगीपत्र घेणे आणि विद्युत व्यवस्थेसाठी MSEB कडून अधिकृत वीज जोडणीसाठी अर्ज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी तरुणाईने व्यसनांपासून दूर राहून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, तसेच पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करू नये, असे आवाहन केले. यावेळी श्री देव रवळनाथ ट्रस्टचे सचिव सातवेकर सर यांनी गणेश आगमन व विसर्जन मिरवणुका ढोल-ताशे, हलगी आणि पारंपरिक भजनी मंडळांच्या माध्यमातून काढण्याचे आवाहन केले. गणेशोत्सवाच्या नावाखाली अनुचित प्रकारांना थारा देऊ नये आणि तरुणाईने चुकीच्या मार्गाला लागू नये, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी श्री देव रवळनाथ ट्रस्टच्या वतीने पोलीस निरीक्षक एन. आर. चोखंडे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. या बैठकीस तालुक्यातील ८५ पोलीस पाटील, ४८ सार्वजनिक तसेच ‘एक गाव–एक गणपती’ मंडळांचे पदाधिकारी, १२ डॉल्बी साउंड व मंडप डेकोरेटर्सचे चालक-मालक, पत्रकार आणि सजग नागरिक उपस्थित होते. गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!