
हेमाडगा शाळेतील शिक्षकाने बनवले शिक्षकोपयोगी ‘अॅप;
आमदारांच्या हस्ते उद्घाटन, कौतुकाची थाप
खानापूर: राजू कुंभार
सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, हेमाडगा येथील तंत्रस्नेही मुख्याध्यापक किशोर शितोळे यांनी कर्नाटकातील शाळांमधील मध्यान्ह भोजन योजनेचे कामकाज अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी ‘School MDM Manager’ या नाविन्यपूर्ण मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. शिक्षकदिनाच्या शुभमुहूर्तावर खानापूरचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते या अॅपचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
या सोहळ्यास खानापूरचे क्षेत्र शिक्षणाधिकारी श्री. मंजुनाथ हत्ती, अक्षरदासोहचे सहाय्यक संचालक श्री. विनायक जकाती यांच्यासह विविध क्षेत्रांतील अधिकारी, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मुख्याध्यापक किशोर शितोळे यांच्या या तंत्रज्ञानपूरक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
शिक्षकांचा मौल्यवान वेळ वाचणार; कागदी घोड्यांना फाटा!
शाळेतील मध्यान्ह भोजन योजनेचा दैनंदिन व मासिक हिशोब ठेवणे, धान्यसाठा, दूध लाभार्थी, पुरवठा आणि शिल्लक नोंदी करणे यात शिक्षकांचा बराच वेळ खर्च होत असे. ही अडचण ओळखून शितोळे गुरुजींनी सलग चार महिने अथक परिश्रम घेऊन हे अॅप विकसित केले.
अॅपची प्रमुख वैशिष्ट्ये:
* स्वयंचलित गणना: वर्गगटनिहाय विद्यार्थी संख्या, भोजन-दूध लाभार्थी, धान्य वापर व खर्चाची अचूक आकडेमोड.
* एक क्लिकवर अहवाल: दैनंदिन आणि मासिक सारांशासह थेट PDF अहवाल जनरेट करण्याची सुविधा.
* चूकमुक्त कामकाज: हिशोबातील चुका टळून मध्यान्ह भोजनाच्या नोंदी अधिक स्पष्ट व सुटसुटीत राहण्यास मदत.
Google Play Store वर उपलब्ध!
शिक्षकांचे काम अधिक सोपे करणारे हे अॅप आता अधिकृतपणे Google Play Store वर मोफत उपलब्ध झाले असून राज्यातील सर्व शाळांना ते सहज डाऊनलोड करून वापरता येणार आहे.
“चार महिन्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांना मिळालेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. अॅपच्या निर्मितीपासून चाचणी आणि प्रकाशनापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, सहकाऱ्यांचे व मित्रांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
किशोर शितोळे (निर्माते व मुख्याध्यापक)
📲 अॅप आजच डाऊनलोड करा: Google
Play Store Link
https://play.google.com/store/apps/details?id=guru.shala.schoolmdmmanager
Advertise


