२५ तोळे सोने परत नकरणाऱ्या सोनाराविरुद्ध उद्या आमरण उपोषण
खानापूर: राजू कुंभार
खानापूर शहरातील स्टेशन रोडवरील एका नामांकित सोन्याच्या व्यापाऱ्याने गहाण ठेवलेले तब्बल २५ तोळे सोन्याचे दागिने परत नकेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेने संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. व्याजासह पूर्ण कर्ज फेडल्यानंतरही हे दागिने परत करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप बेकवाड (ता. खानापूर) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रुक्कमाण्णा शंकर जुंजवाडकर यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणी पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या जुंजवाडकर यांनी उद्या ५ ऑक्टोबरपासून थेट सोनाराच्या दुकानासमोर कुटुंबासह बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
नेमकी काय आहे फसवणुकीची कथा?
पत्रकारांशी बोलताना रुक्कमाण्णा जुंजवाडकर यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये मुलीच्या विवाहासाठी त्यांनी स्टेशन रोडवरील एका सोन्याच्या व्यापाऱ्याकडे आपले २५ तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी व्याजासह सर्व रक्कम भरून कर्ज फेडले आणि त्याच दिवशी आपले गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने परत मागितले. त्यावेळी संबंधित सोनाराने “दागिने लॉकरमध्ये ठेवले आहेत, दोन दिवसांनी येऊन घेऊन जा”, असे सांगून वेळ मारून नेली. मात्र, त्यानंतर २ दिवस उलटूनही जुंजवाडकर यांनी वारंवार मागणी केली असता त्यांना दागिने परत देण्यात आले नाहीत आणि आजतागायत ते दागिने मिळालेच नाहीत.
पोलीस प्रशासनाच्या सुस्त कारभारावर प्रश्नचिन्ह!
आपल्या हक्काचे सोने मिळवण्यासाठी जुंजवाडकर यांनी प्रशासनाचे सर्व दरवाजे ठोठावले आहेत,१० मार्च २०२६: खानापूर पोलीस ठाण्यात सोनाराविरुद्ध पहिली अधिकृत तक्रार दाखल केली. १८ सप्टेंबर २०२६: टपालाद्वारे (पोस्टाने) मराठीतून संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती देणारा अर्ज पाठवला. २८ सप्टेंबर २०२६ बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) यांची भेट घेऊन न्यायाची मागणी करणारा अर्ज सादर केला.
एवढे अर्ज आणि तक्रारी देऊनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस चौकशी अथवा कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उद्या 5 ऑक्टोबरपासून ‘गांधीगिरी’ मार्गाने आमरण उपोषण!
प्रशासनाकडून कोणताही न्याय न मिळाल्यामुळे अखेर जुंजवाडकर यांनी आरपारच्या लढ्याची भूमिका घेतली आहे. ५ ऑक्टोबर २०२६ पासून ते स्टेशन रोडवरील संबंधित सोनाराच्या दुकानासमोर आपली पत्नी आणि मुलांसह गांधीगिरी पद्धतीने बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत.
या उपोषणासाठी परवानगी द्यावी, असा अर्ज त्यांनी पोलिसांना दिला असून, उपोषणादरम्यान आपल्या किंवा आपल्या कुटुंबाच्या जिवाला काही धोका निर्माण झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यापारी व पोलीस प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सर्व खानापूरकरांचे लक्ष पोलीस कारवाईकडे! २५ तोळे सोन्याच्या या मोठ्या आणि खळबळजनक प्रकरणामुळे शहरातील व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या तक्रारीवर आता पोलीस प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते, सोनाराची यावर काय प्रतिक्रिया येते आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Advertise



