सिंगिनकोप गायरन जमिनीवर डल्ला मारणाऱ्यांचे धाबे दणाणले!
फौजदारी गुन्ह्यांची टांगती तलवार!
विद्यार्थ्यांच्या हक्काच्या क्रीडांगणावर अतिक्रमण करणाऱ्यांवर प्रशासनाचा दणका; ग्रामपंचायतीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह!
राजू कुंभार :नागुर्डा
खानापूर तालुक्यातील इदलहोंड ग्राम पंचायत हद्दीतील सिंगिनकोप्प गावात शासकीय गायरान जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवून गवत गंज्या ठेवणाऱ्या,शेड उभारणाऱ्या आणि ताबा मारणाऱ्या स्थानिकांचे धाबे दणाणले. येथील शासकीय गायरान जमिनीवर झालेल्या अवैध अतिक्रमणाविरोधात जिल्हा प्रशासनाने अत्यंत कडक पवित्रा घेतला असून, खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा ‘स्पेशल सर्व्हे’ करणार आहेत. एवढेच नव्हे तर अतिक्रमण हटवण्याबरोबरच महसूल जमिनीच्या कायद्यांतर्गत थेट फौजदारी खटले (गुन्हे) दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमका प्रकार? सर्वे नंबर ४ मधील सावळागोंधळ
सिंगिनकोप येथील गायरान सर्व्हे नंबर ४ मध्ये एकूण १०.२२ एकर इतकी विस्तृत सरकारी जागा आहे. या जागेमध्ये हिंदू स्मशानभूमी, तलाव, शाळा आणि गावासाठी एक क्रिकेट मैदान आहे. परंतु, याच राखीव व क्रीडांगणाच्या जागेवर काहींनी चक्क शेड उभारले आहेत, तर काहींनी जनावरांच्या चारेसाठी गवत गंज्या रचून आणि चारा पेरून अतिक्रमण चालवले आहे. हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असताना स्थानिक ग्रामपंचायतीने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ; खेळाच्या मैदानावर अतिक्रमण
गावातील शासकीय कन्नड व मराठी कनिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हक्काचे मैदानच उरलेले नाही. मैदानाअभावी विद्यार्थ्यांच्या शालेय व क्रीडा विकासावर मोठा परिणाम होत आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत शासकीय कन्नड व मराठी कनिष्ठ प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी तसेच समस्त ग्रामस्थांनी आक्रमक होत १२ नोव्हेंबर रोजी खानापूरच्या तहसीलदारांना धडक निवेदन सादर केले होते.
आता होणार धडक कारवाई!
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता या संपूर्ण जमिनीचा तातडीने विशेष सर्व्हे (Special Survey) केला जाणार असून चेकबनदी करण्यात येणार आहे. शासकीय संपत्तीवर डल्ला मारणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्काच्या मैदानावर अतिक्रमण करणाऱ्यांवर न्यायालयामार्फत कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई होणार असल्याने अतिक्रमणकर्त्यांची झोप उडाली आहे.
निवेदना खाली ग्रामस्थांसह गर्लगुंजीचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, रामानंद पाटील, नागेश पाटील, प्रशांत कुंभार, बापूजी कुंभार, अनिरुद्ध कुंभार, परशराम पाटील, महेश पाटील, सतीश पाटील, महादेव देसाई, अजय कुंभार, राम कुंभार, ज्ञानेश्वर तारीहाळकर, सचिन कुंभार, विशाल कुंभार, ओमकार पाटील, यल्लाप्पा कुंभार, प्रथमेश कुंभार, साहिल कुंभार, प्रेमानंद पाटील, श्याम तारीहाळकर, योगेश कुंभार, शिवानंद तिरकंनवर, नयन कुंभार, बसवराज पाटील, प्रकाश कोलकार, विठ्ठल पाटील, सागर कुंभार यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.
Advertise

Advertis


