‘शिवरायांच्या विचारांचा वारसा’; आर्यन ग्रुप ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी.
चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची रुजवणूक व्हावी आणि त्यांच्यातील गड-किल्ल्यांविषयीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, या उद्देशाने ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ चंदगड यांच्यावतीने आयोजित भव्य किल्ले बांधणी स्पर्धा-२०२६ चा बक्षीस वितरण सोहळा शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘शिवशक्ती स्थळ’ येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

छोट्या शिवभक्तांचा अभूतपूर्व सहभाग:
सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित या स्पर्धेला चंदगड शहरातील बाल शिवभक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर एकापेक्षा एक सरस आणि सुंदर किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारून उपस्थितांना थक्क केले. गड-किल्ल्यांचा इतिहास, शिवरायांचे शौर्य आणि स्वराज्याविषयीची माहिती या चिमुकल्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने परीक्षकांसमोर सादर केली.

मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार बक्षीस वितरण:
या बक्षीस वितरण सोहळ्यात ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे धारकरी श्री. अनिकेत घाडगे, अनिकेत सावंत, गणेश मुळीक, सुनील कांबळे आणि आयुष देसाई यांच्यासह चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. सुनील काणेकर, इतर मान्यवर व बालशिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विजेत्या बाल मावळ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

किल्ला बांधणी स्पर्धा-२०२६ चे अधिकृत निकाल:
प्रथम क्रमांक: आर्यन ग्रुप, चंदगड (प्रतापगड)
द्वितीय क्रमांक: हिंदू चौक मित्र मंडळ, चंदगड (हरिहर गड)
तृतीय क्रमांक: छावा ग्रुप, चंदगड (पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड)
चतुर्थ क्रमांक: शिवशंभो ग्रुप, देसाईवाडी चंदगड (तोरणा-प्रचंडगड)
पाचवा क्रमांक: शिवराय ग्रुप, चंदगड (उंदेरी दुर्ग)
विशेष पुरस्कार:
उत्कृष्ट बांधणी: माऊली ग्रुप, चंदगड (सुवर्णदुर्ग किल्ला)
उत्कृष्ट माहिती प्रस्तुतीकरण: छावा ग्रुप, चंदगड (पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड)
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व आयोजकांचे आणि विजेत्या बाल मावळ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

