हरसनवाडी-कांजळे क्रॉस बनला ‘मृत्यूचा सापळा’
राजू कुंभार/नागुर्डा
खानापूर-जांबोटी मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू असले, तरी कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या कमालीच्या निष्काळजीपणामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. विशेषतः हरसनवाडी-कांजळे क्रॉसवरील रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या (साईड पट्ट्या) न भरताच काम अर्धवट सोडल्याने या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू झाली आहे. या जीवघेण्या प्रकाराची गंभीर दखल घेत माजी ग्रामपंचायत सदस्य पावलु फर्नांडिस. व विनायक मुतगेकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत, तर उच्च न्यायालयाचे वकील सोनाप्पा नांद्रकर यांनी तात्काळ सुधारणा न झाल्यास थेट उच्च न्यायालयात धाव घेण्याचा सज्जड इशारा दिला आहे.
अर्धवट कामामुळे निष्पाप प्रवाशांचा जीव धोक्यात
डांबरीकरण करताना रस्त्याची उंची वाढवण्यात आली, मात्र कडेच्या बाजूच्या पट्ट्या भरण्याचे सौजन्य कंत्राटदाराने दाखवलेले नाही. परिणामी, हरसनवाडी-कांजळे क्रॉस येथे रस्त्याची कडा अत्यंत तीव्र आणि असमान (खोलगट) झाली आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचे चाक या तीव्र कडेवरून खाली घसरल्यास थेट भीषण अपघात घडत आहेत. यापूर्वीही या जीवघेण्या टप्प्यावर अनेक अपघात होऊन काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तरीही प्रशासन आणि कंत्राटदार कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे.
प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर तीव्र संताप
नागरिकांच्या जीवाशी खेळणारा हा हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य पावलु लोबो यांनी प्रत्यक्ष क्रॉसवर जाऊन या धोकादायक परिस्थितीची पाहणी केली आणि ही गंभीर समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
हायकोर्टात खेचण्याचा वकिलांचा सज्जड दम
या गंभीर प्रकाराबाबत उच्च न्यायालयाचे वकील सोनाप्पा नांद्रकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. “रस्त्याची ही जीवघेणी अवस्था म्हणजे संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा आणि कर्तव्यच्युतीचा कळस आहे. या टाळता येण्यासारख्या चुकीमुळे विनाकारण कायदेशीर लढा देण्याची आमची इच्छा नाही; मात्र, प्रशासनाने जर तातडीने या क्रॉसवरील प्रवेश भागाची कडा रुंद करून त्याचे योग्य सपाटीकरण (लेव्हलिंग) केले नाही, तर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून थेट उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल,” असा खरमरीत इशारा ॲड. नांद्रकर यांनी दिला आहे.
आता तरी संबंधित बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराला जाग येणार का, की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रशासन वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल खानापूर-जांबोटी मार्गावरील प्रवाशांमधून विचारला जात आहे.
Advertise

Advertise


