
म्हशींची चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; स्थानिक खबरी कोण?
खानापूर / राजू कुंभार
खानापूर तालुक्यात गुन्हेगारी कारवाया वाढल्या असून, नुकतीच एक म्हशी चोरी करणारी कुख्यात टोळी खानापूर पोलिसांनी गजाआड केली आहे. मात्र, या चोरांना नेमकी कुणी मदत केली आणि त्यांचा ‘लोकल खबरी’ कोण होता, याचा पर्दाफाश होणार का? हा आता एक मोठा व कळीचा मुद्दा बनला असून, यामागच्या म्होरक्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
अशी घडली होती घटना
शुक्रवार दि. २३ रोजी रात्रीच्या सुमारास ओलमनी येथील शेतकरी मारुती पवार यांच्या शेतातील गोट्याला लक्ष करत अडीच लाख रुपयांच्या दोन म्हशी अज्ञात चोरांनी लांबवल्या होत्या. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
काँग्रेस नेते सुरेश जाधव यांच्या मध्यस्थीमुळे लागला सुगावा
या गंभीर प्रकरणाची दखल घेत काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यांनी तत्काळ खानापूर पोलिसांना या चोरीची कल्पना दिली. एवढेच नव्हे, तर संशयिताचे नाव आणि फोन नंबरसुद्धा पोलिसांच्या हाती सुपूर्द केले. या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरीसाठी वापरण्यात आलेली कर्नाटक, बेळगाव पासिंगची चारचाकी गाडी ताब्यात घेतली.
दोन दिवसांत पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पोलिसांनी चक्र वेगाने फिरवत अवघ्या दोन दिवसांत तपास चक्र पूर्ण केले आणि सौंदती येथील हुलीकत येथून संशयितांना जेरबंद केले. या गुन्ह्यात ४ ते ५ जणांची टोळी सक्रिय असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी सर्व म्हशी चोरांना बेड्या ठोकल्या आहेत आणि चोरीला गेलेल्या दोन्ही म्हशी सुरक्षितरीत्या आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.
स्थानिक खबरीचा शोध कधी लागणार?
पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करून मोठी कामगिरी बजावली असली, तरी बाहेरील चोरांना ओलमनी येथील मारुती पवार यांच्या गोट्याची आणि म्हशींची इतकी अचूक माहिती कशी मिळाली? रात्रीच्या वेळी नेमकी रेकी करून कुणी या चोरांना फूस लावली? या चोरीमागील ‘लोकल खबरी’ (स्थानिक संशयित) कोण? या प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत. पोलीस या स्थानिक म्होरक्यांना आणि खबऱ्यांना कधी अटक करणार? याकडे आता संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Advertise


