
काँग्रेसच्या दणक्यानंतर खानापूर प्रशासन ॲक्शन मोडवर
रस्ता दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरू
खानापूर: राजू कुंभार
हेस्कॉम (HESCOM) ऑफिस आणि फिश मार्केटपासून थेट मलप्रभा नदीच्या पुलापर्यंतच्या रस्त्याची दैना उडाली आहे. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असताना झोपेचे सोंग घेतलेल्या खानापूर प्रशासनाला अखेर जाग आली आहे. मात्र, ही जाग नागरिकांच्या त्रासामुळे नव्हे, तर तालुका काँग्रेसने सोमवारी दिलेल्या आंदोलनाच्या थेट इशाऱ्यामुळे आली आहे. राजकीय दणका मिळताच ‘ॲक्शन मोड’मध्ये आल्याचा आव आणत प्रशासनाने आता रस्त्याच्या कामासाठी युद्धपातळीवर पळापळ सुरू केली आहे.
वर्षभर या प्रमुख मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना कंबरमोडे खड्डे आणि धुळीचे साम्राज्य सहन करावे लागत होते. समोर गणेशोत्सव तोंडावर आला तरीही प्रशासनाचे डोळे उघडायला तयार नव्हते. अखेर ब्लॉक कॉंग्रेस चे अध्यक्ष ईंश्वर घाडी, यशवंत बिरजे, विनायक मुतगेकरऍड . एच एन सरदेसाई आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. चतुर्थीच्या आत रस्त्याची डागडुजी न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निलावडे ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष तसेच माजी ग्रामपंचायत युनियन अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी दिला होता. याशिवाय, रस्ता वेळेत दुरुस्त न झाल्यास संबंधित विभागावर ‘लोकायुक्त’मध्ये तक्रार दाखल करून पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला होता. काँग्रेस नेत्यांच्या या इशाऱ्याची दखल प्रशासनाने घेतली आहे.
दरवर्षी सण-उत्सव डोक्यावर आले किंवा आंदोलनाची टांगती तलवार मानगुटीवर बसली तरच प्रशासनाला रस्त्यांची आठवण का होते? असा खरमरीत सवाल आता नागरिक विचारत आहेत.
कंत्राटदार आणि प्रशासनाच्या या ‘लेटलतीफ’ कारभारामुळे ऐन सणाच्या काळात रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. हा प्रशासनचा बुलडोझर स्टंट’ आहे की, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून खरोखरच दर्जेदार काम होणार, याकडे आता संपूर्ण खानापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
तक्रारदारांशी चर्चा सावंत आणि चव्हाण कुटुंबीयांशी रस्त्याच्या न्यायालयीन तक्रारी संधर्भात चर्चा केली असून संबंधित तक्रारदारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी खानापूर वकील संघटना जिल्हा अधिकार्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहित वकील संघटनेचे अध्यक्ष तसेच तालुका ब्लॉक काँग्रेस चे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी दिली.

Advertise



