उसाचा दुसरा हप्ता 300 रू चा द्या, अन्यथा उग्र आंदोलन करु 


उसाचा दुसरा हप्ता 300 रू चा द्या, अन्यथा उग्र आंदोलन करु 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

खानापूर:स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने  ‘दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड’ (हलकर्णी, ता. चंदगड), म्हाळुंगे, हेमरस यांच्याकडे सन २०२५-२६ च्या गाळप हंगामात तुटलेल्या उसाला प्रतिटन ३०० रुपये दुसरा हप्ता तत्काळ अदा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेचे बेळगाव तालुका अध्यक्ष श्री परुराम महादेव पाटील यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना पत्र दिले आहे.

निवेदनातील प्रमुख मुद्दे:

२०२५-२६ च्या गाळप हंगामातील उसाला कारखान्याने प्रतिटन ३४०० रुपये अदा केले आहेत. तसेच २४/११/२०२५ च्या पत्रानुसार गाळप हंगाम संपल्यानंतर प्रतिटन १०० रुपये तत्काळ देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. या वर्षी साखर विक्री, बगॅस, मोलासेस, इथेनॉल व इतर उपपदार्थांना (By-Products) बाजारपेठेत चांगला भाव मिळाला आहे. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार शेतकरी नफ्यात भागीदार असून कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे.खते, औषधांचे वाढलेले दर, ऊसतोडणी व वाहतूकदारांकडून घेतली जाणारी खुशाली आणि वाढलेली मजुरी यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी हे मोठे सण जवळ आले असून वाढत्या महागाईच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधाराची गरज आहे.

या सर्व परिस्थितीचा विचार करून कारखान्याने २०२५-२६ च्या उसाला प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना तत्काळ अदा करावा, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पत्राद्वारे केली आहे.

यावेळीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नागूर्डा (ता. खानापूर) येथील पदाधिकारी शंकर महाजन,जोतिबा मोगरे अनिल गुरव, रामू कुप्पटगिरीकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थीत होते.

Advertise

Advertise


108
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!