निंबाळकरांचे हलगेकरांना ओपन चॅलेंज
खानापूर राजकीय वातावरण तापले
खानापूर: राजू कुंभार
“तुम्हीही कागदपत्रे घेऊन या, मीही कागदपत्रे घेऊन येते. गेल्या तीन वर्षांत तालुक्यासाठी कोणी आणि किती विकासकामे केली, याचा हिशेब जनतेसमोर मांडूया,” असे थेट आणि ‘ओपन चॅलेंज’ खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी विद्यमान भाजप आमदार विठ्ठल हलगेकर यांना दिले आहे. या आव्हानामुळे खानापूर तालुक्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानी आज (गुरुवारी) पत्रकर परीषद घेतली होती.
“कागदपत्रांसह समोरासमोर या”
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. निंबाळकर म्हणाल्या, “गेल्या तीन वर्षांत किती कामे झाली, हे तुम्हीही सांगा आणि मीही सांगते. जनतेला आणि मलाही सत्य कळू द्या. एकदा समोरासमोर चर्चा होऊनच जाऊ दे. जनतेलाही नेमके सत्य काय आहे ते समजेल.” विकासकामांबाबत कागदपत्रांच्या आधारे खुली चर्चा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
कूसमळी प्रकल्पावर स्पष्टीकरण
आमदार हलगेकर यांच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना त्या म्हणाल्या, “मी मंजूर केलेली कामे आजही सुरू आहेत, ही आनंदाचीच बाब आहे आणि स्वतः आमदारांनी त्याची कबुली दिली आहे. मात्र, सर्वपक्षीय सभेत त्यांनी ‘कूसमळी प्रकल्प’ निंबाळकरांनी मंजूर केला असे विधान केले. मुळात या प्रकल्पाला २०२४ मध्ये मंजुरी मिळाली आणि २०२५ मध्ये त्याची वर्क ऑर्डर निघाली. या कामात माझा कोणताही हातभार नाही. आपल्या तालुक्यातील पाणी बाहेर वाहून जाता कामा नये, कारण स्थानिक शेतकरी व जनतेला पाण्याची नितांत गरज आहे.”
घरकुल योजनेवरून घणाघात
तालुक्यातील घरकुल योजनेच्या मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. “गेल्या तीन वर्षांत खानापूर तालुक्यात एकही घरकुल मंजूर झालेले नाही. असा आरोप त्यांनी केला.
आपल्या ५ वर्षांच्या कार्यकाळातील (२०१८ ते २०२३) आकडेवारी मांडताना त्या म्हणाल्या, “मी नगरपंचायतीसाठी १७६ घरांसाठी सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी आणला. स्लम बोर्डाच्या माध्यमातून २७ कोटी रुपये खर्चून ४५० घरे मंजूर केली. तसेच विविध ग्रामपंचायत क्षेत्रांत ३,८४७ घरांसाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या सर्व बाबींचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि आरटीआयच्या माध्यमातूनही हे कागदपत्रे मिळू शकतात.”
दरम्यान, सध्या काही नेते घरकुलाच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळत असल्याची चर्चा आहे. मात्र, सध्या कोणत्याही नवीन घरकुल योजनेला मंजुरी मिळालेली नसल्याने नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये व कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
“भाजप कार्यकर्ते अन् नेतेही आमदारांना कंटाळले”
सत्ताधारी आमदारांवर टीका करताना डॉ. निंबाळकर म्हणाल्या, “आज भाजपचे कार्यकर्ते आणि नेते स्वतः मान्य करत आहेत की, आमदार निवडून देताना आमच्याकडून चूक झाली. तालुक्यातील स्थानिक कंत्राटदारांना कामे न देता बाहेरील कंत्राटदारांना दिली जात आहेत, कारण स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून कमिशन कसे मागणार? म्हणून बाहेरील कंत्राटदार आणले जात आहेत.”
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सवाल
‘भाग्यलक्ष्मी / लैला शुगर्स’च्या माध्यमातून सुरू असलेल्या ऊसतोडणीतील पक्षपातावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. “ऊस तोडणीत भाजप समर्थकांच्या उसाला प्राधान्य दिले जाते. इतर शेतकरी काय शेतकरी नाहीत का? मराठी भाषिक असो वा कन्नड भाषिक, प्रत्येक शेतकऱ्याला समान न्याय मिळाला पाहिजे. उसाला योग्य वेळ, वेळेवर तोडणी आणि योग्य दर का मिळत नाही?” असा प्रश्नांचा भडीमार त्यांनी केला.
अवरोळी गायरान जमिनीच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप
अवरोळी येथील १४१ एकर गायरान जमिनीच्या गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत डॉ. निंबाळकर म्हणाल्या, “शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून १४१ एकर गायरान जमीन परस्पर मठाच्या नावावर करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, या गैरव्यवहारात कोणाचा हात आहे हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
पत्रकार परिषदेला तोहीद चांदखन्नवर (नगरसेवक)महादेव कोळी (केपीसीसी मेंबर)सावित्री मादार (महिला अध्यक्ष)महांतेश राऊत ( ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष)साईश सुतार ( युवाअध्यक्ष)उपस्थित होते.
डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिलेल्या या थेट आव्हानामुळे खानापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता आमदार विठ्ठल हलगेकर हे चॅलेंज स्वीकारणार का आणि भाजप नेते या आव्हानाला काय प्रत्युत्तर देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Advertise





