गडहिंग्लजमधील छायाचित्रकार अश्फाक किल्लेदार यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन दशकांच्या अनुभवांचा अनोखा चित्रप्रवास.
गडहिंग्लज प्रतिनिधी : स्वप्नील कुंभार
गडहिंग्लज विभागात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध छायाचित्रकार अश्फाक किल्लेदार यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या श्री. शाहू सभागृहात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनातील विविध छायाचित्रे रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच विविध स्तरावरील मान्यवर व राजकीय व्यक्तींच्या भेटी सुद्धा या छायाचित्र प्रदर्शनाला होत आहेत. कागल विधानसभेचे आमदार माननीय नामदार हसनसो मुश्रीफ व गडहिंग्लज नगर परिषदेचे सर्व नगरसेवक यांनी देखील या प्रदर्शनाला भेट देऊन अशपाक किल्लेदार यांचा गौरव केला

अश्फाक किल्लेदार यांनी २००३ पासून छायाचित्रण क्षेत्रात प्रवेश केला. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले सामाजिक, ग्रामीण आणि निसर्गाशी संबंधित असंख्य क्षण या प्रदर्शनातून रसिकांसमोर मांडले आहेत.
या प्रदर्शनात शेती आणि शेतकरी, कष्टकरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या सर्वसामान्यांचे जीवन, ग्रामीण संस्कृती, पारंपरिक व काळाच्या ओघात विस्मृतीत जाणारे खेळ, यात्रा, पाऊस, निसर्गातील अद्भुत क्षण तसेच विविध थरारक प्रसंगांचे वास्तवदर्शी छायाचित्रण पाहायला मिळते. अनेक छायाचित्रांमधून ग्रामीण जीवनातील समस्या आणि त्यामागील वास्तवही प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे.

प्रदर्शनातील काही छायाचित्रे पाहताना रसिकांना आपल्या बालपणीच्या आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, किल्लेदार यांनी टिपलेल्या अनेक छायाचित्रांना विविध स्पर्धा व विभागीय स्तरांवर पारितोषिके मिळाली असून त्यातून त्यांच्या छायाचित्रणातील कौशल्याची दखल घेतली गेली आहे.
‘प्रत्येक कलात्मक नजरेची दाद माझ्यासाठी शिकवण’
“चूकणे हा माणसाचा गुणधर्म आहे, त्यामुळे या जगात कोणीही परिपूर्ण नाही. माझ्या चित्रप्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक कलात्मक नजरेच्या व्यक्तीकडून मला मिळणारी दाद ही माझ्यासाठी नवीन शिकवण असेल. त्या शिकवणीनुसार माझ्या छायाचित्रणात आवश्यक ते बदल करत राहीन,” अशी भावना अश्फाक किल्लेदार यांनी ‘ग्रामदूत न्यूज’शी बोलताना व्यक्त केली.
२९ ते ३१ ऑगस्टदरम्यान प्रदर्शन
अश्फाक किल्लेदार यांचे हे छायाचित्र प्रदर्शन २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान गडहिंग्लज येथील श्री. शाहू सभागृहात खुले राहणार आहे. छायाचित्रकलेची आवड असणाऱ्या तसेच ग्रामीण जीवन आणि निसर्गाचे विविध पैलू अनुभवू इच्छिणाऱ्या रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




