‘चंदगडचे बाप्पा’तर्फे आयोजित स्पर्धेत ५७ स्पर्धकांचा सहभाग; बालकलाकारांसह सर्व सहभागींचा गौरव.
चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
“चंदगडचे बाप्पा” उत्सव गणेशाचा, सोहळा लोकमान्यांच्या एकजुटीचा’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या घरघुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. गेल्या चार वर्षांपासून या स्पर्धेचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून, यावर्षी तब्बल एकूण ५७ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. सुनील काणेकर, गणेश अर्बन चे चेअरमन,काजू उद्योजक श्री. पांडुरंग काणेकर, तसेच नगरपंचायतीचे नगरसेवक श्री. अजिंक्य पिळणकर, सुधीर पिळणकर, तसेच साहिल चव्हाण, नंदकुमार गावडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंदगड शहरातील बालकलाकार कु. पार्थ राजेश कोठारी आणि कु. शौर्य वाडकर यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या श्री गणेशाच्या छोट्या मूर्तींचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दोन्ही बालकलाकारांचा गणेशमूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धेत उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

श्री . पांडुरंग काणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या बालपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी सांगितल्या. त्याकाळी सगळीकडे सर्रास मातीचे गणपती तसेच चंदगड मधील विविध प्रकारचे जिवंत व स्थिर देखावे पाहण्यासाठी होणारी लोकांची गर्दी कमी होऊ लागलेली आहे त्या कलात्मक उपक्रमांना, देखाव्यांना पुन्हा चालना मिळावी आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून चंदगडमध्ये आकर्षक देखावे साकारले जावेत, जेणेकरून बाहेरील नागरिकांची चंदगडमध्ये वाढती रेलचेल होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. सुनील सुभाष काणेकर यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेचा उल्लेख करत, आजही ही परंपरा उत्साहाने पुढे सुरू असल्याचे सांगितले. ‘चंदगडचे बाप्पा’तर्फे आयोजित या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे तसेच आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले. या प्रकारच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातूनही सहकार्य केले जाईल , पुढील वर्षीपासून नगरपंचायतीमार्फत ही स्पर्धा आणखी दिमाखदार पद्धतीने आयोजित करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
स्पर्धेचा निकाल
चंदगडचा कलाधिपती बक्षीस वितरण :
🥇 प्रथम – प्रथमेश गोंधळी, शिवाजी गल्ली
मूर्तिकार – निखिल कुंभार
🥈 द्वितीय – आदिनाथ पिळणकर, बाजारपेठ, चंदगड
उत्कृष्ट सजावट :
🥇 प्रथम – मंजुनाथ गावडे, (गांधीनगर)
🥈 द्वितीय – योगीराज बागीलगेकर, (शिवाजी गल्ली)
🥉 तृतीय – सिद्धार्थ पेडणेकर, (रामदेव गल्ली)
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री. साहिल वाडकर, श्री. प्रतिक गोंधळी, श्री. अमोल गुलामकर यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. श्री. प्रतिक गोंधळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून रवी शिंदे व मनवेंद्र पवार (गडहिंग्लज) यांनी कार्य पाहिले. त्यांच्या परीक्षणातून स्पर्धेतील उत्कृष्ट सजावटींची निवड करण्यात आली.


