बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गावर ‘वाळलेली झाडे’ ठरतायत मृत्यूचा सांगडा


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; तातडीने वाळलेले वृक्ष हटवण्याची मागणी.

उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार (चंदगड,आजरा, गडहिंग्लज)

कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन महत्त्वाच्या राज्यांना जोडणारा बेळगाव-वेंगुर्ला हा अत्यंत गजबजलेला महामार्ग सध्या प्रवाशांसाठी धोक्याचा घंटा ठरत आहे. या मार्गावरील शिनोळी ते सडेगुडवळे दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक जुनाट आणि पूर्णपणे वाळलेली झाडे कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांच्या शिरावर अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

​या राज्यमार्गावर आंबा, वड, पिंपळ आणि फणसासह अनेक जंगली प्रजातींची अतिशय जुनी वृक्षे आहेत. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर ही झाडे व त्यांच्या फांद्या आता जीर्ण आणि पोकळ झाल्या आहेत. चंदगड तालुक्यात मान्सूनमध्ये होणारा मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे या झाडांच्या मोठ्या फांद्या किंवा संपूर्ण वृक्षच रस्त्यावर उन्मळून पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

​कुर्तनवाडी प्रवेशद्वाराजवळ भीषण अपघाताची शक्यता

कुर्तनवाडी गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक महाकाय वाळलेले झाड उभे असून ते अत्यंत धोकादायक वळणावर आहे. वादळी पावसात हे झाड रस्त्यावर कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून या झाडावर तातडीने कुऱ्हाड चालवणे गरजेचे बनले आहे.

​शिनोळी ते कानूर मार्गाची पाहणी करण्याची मागणी

प्रशासनाने एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, अशी ठाम भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शिनोळी, यशवंतनगर, कारवे, पाटणे फाटा, हलकर्णी, कुर्तनवाडी, नागनवाडी, चंदगड फाटा आणि कानूर या संपूर्ण पट्ट्याची प्रत्यक्ष पाहणी करावी.

​सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कारवाई करावी

“हा मार्ग तीन राज्यांमधील वाहतुकीचा मुख्य कणा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाची आवश्यक परवानगी घेऊन रस्त्याला अडथळा ठरणारी आणि प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण करणारी सुकलेली झाडे तातडीने हटवावीत,” अशी मागणी नांदवडे सेवा सोसायटीचे चेअरमन विठोबा गावडे यांनी केली आहे.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!