
नागुर्डा-वाड्याच्या नागेश देव महारुद्र मंदिरात चोरी
दानपेटीतील रोख रकमेसह सीसीटीव्हीची हार्ड डिस्क लंपास
तालुका /प्रतिनिधी
नागुर्डा-वाडा येथील नागेश देव महारुद्र मंदिरात अज्ञात चोरांनी घरफोडी करून दानपेटीतील नगदी रकमेसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची हार्ड डिस्क पळवल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून गुरुवारी सकाळी पूजेसाठी गेलेल्या ग्रामस्थांना मंदिराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले.
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच नागेश देव महारुद्र मंदिराचे लोकार्पण झाले होते. मंदिर गावाबाहेर शांत परिसरात असल्याने या निर्जनतेचा फायदा घेत अज्ञात चोरांनी बुधवारी रात्री धाडसी चोरी केली. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे मंदिराचे पुजारी व काही नागरिक पूजेसाठी गेले असता, मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी तातडीने मंदिराकडे धाव घेतली. चोरांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश न केल्याने देवाचे दागिने व मूर्ती सुरक्षित आहेत. मात्र, गाभाऱ्याबाहेर ठेवलेली दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरांनी लंपास केली. तसेच आपली ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने चोरांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेची हार्ड डिस्कही सोबत पळवून नेली.
दरम्यान, या परिसरात आणि संपूर्ण तालुक्यातच गेल्या काही दिवसांपासून मंदिरांमध्ये घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप व चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या चोरीचा त्वरित तपास लावून आरोपींना गजाआड करावे आणि रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जातआहे.
Advertise


