माजी ग्रामपंचायत अध्यक्षावर जीवघेणा हल्ला!
गोल्याळीत गणेश मंडळाच्या हिशोबावरून तुंबळ हाणामारी
खानापूर / प्रतिनिधी:
गणेशोत्सवाच्या सणासुदीच्या काळात खानापूर तालुक्यातील जांबोटी भाग तणावात आहे. कालच देगाव आणि जामगाव येथे घडलेल्या मारामारीच्या घटना ताज्या असतानाच, आता गोल्याळी येथे गणेश मंडळाचा हिशोब मागण्यासाठी गेलेल्या माजी ग्रामपंचायत अध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे.
मंदिरासमोरच थरार!
मिळालेल्या माहितीनुसार, गोल्याळी येथील मंदिरासमोर ही घटना घडली. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष हे गणेश मंडळाचा हिशोब विचारण्यासाठी गेले असता, तेथे उपस्थित तरुणांशी त्यांचा तीव्र वाद झाला. वादाचे रूपांतर पाहता पाहता हिंसक हाणामारीत झाले. संतापलेल्या टोळक्याने माजी अध्यक्षांसह त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली.
धारदार शस्त्राने वार; परिसर हादरला!
या हल्ल्यादरम्यान एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या भीषण हल्ल्यात माजी अध्यक्षांसह काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत घडलेल्या या रक्ताळलेल्या घटनेमुळे गोल्याळीसह संपूर्ण जांबोटी भागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कालच्या घटनांनंतर आज पुन्हा गोल्याळीत ही घटना घडल्यामुळे पोलिसांच्या गस्तीवर आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
Advertise….





