जांबोटी वडगावच्या साक्षीचे घवघवीत यश!
पहिल्याच प्रयत्नात NEETमध्ये कर्नाटक राज्य क्रमांक 4597 रँक
खानापूर : जांबोटी वडगाव गावची सुकन्या कु. साक्षी प्रभाकर देसाई हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून साक्षीने NEET-UG परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. NEETमध्ये तिने कर्नाटक राज्य क्रमांक 4597 मिळवत वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
साक्षी हिने याआधी बारावीच्या परीक्षेत तब्बल 97.83 टक्के गुण मिळवत उज्ज्वल कामगिरी केली होती, कर्नाटकात 11वा क्रमांक पटकावला होता.
या यशानंतर साक्षीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बागलकोट येथे MBBS वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. ग्रामीण भागातून येत असलेल्या साक्षीने मिळवलेल्या या यशामुळे जांबोटी वडगावसह देसाई परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
साक्षीच्या या यशामागे तिची मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे ठरले. डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने तिने पहिले महत्त्वाचे पाऊल टाकले असून, भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची तिची ध्येयवेडी वाटचाल सुरू झाली आहे.
साक्षीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जांबोटी वडगाव ग्रामस्थ, देसाई परिवार, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. तिच्या यशामुळे गावातील विद्यार्थ्यांनाही शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळाली आहे.
भाजप नेते तथा जांबोटी ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष श्री. सुनील शंकर देसाई यांनीही साक्षीचे अभिनंदन करून तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
“जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील मोठे यश मिळवू शकतात, हे साक्षीने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.”
साक्षीच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी ग्रामदूत परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
Advertise



