ऊस दरासाठी स्वाभिमानीचे हुबळीत आंदोलन 


ऊस दरासाठी स्वाभिमानीचे हुबळीत आंदोलन 

खानापूर: राजू कुंभार

आगामी ऊस दराच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. सौरभ शेट्टी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या भेटीत २९ सप्टेंबर रोजी हुबळी येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होण्याबाबत चर्चा झाली. या आंदोलनाची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असून, ऊस दर व साखरेच्या किमान विक्री दरासह विविध मागण्यांचा मुद्दा त्यामागे आहे.

यावेळी १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणाऱ्या २५व्या ऊस परिषदेबाबतही चर्चा करण्यात आली. या परिषदेकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडण्याचे आवाहन करण्यात आले. २५वी ऊस परिषद १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार असल्याची माहिती संघटनेने जाहीर केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा, या मागणीसाठी साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले होते. या कार्याची संघटनेने दखल घेत बेळगाव तालुका अध्यक्ष श्री. परशराम पाटील यांचे कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना परशराम पाटील यांनी २९ सप्टेंबरच्या हुबळी आंदोलनासाठी तसेच १० ऑक्टोबरच्या २५व्या ऊस परिषदेसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी गावोगावी भेटी घेऊन जनजागृती करण्याची ग्वाही दिली.

यावेळी खानापूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. शंकर महाजन, खानापूर तालुका स्वाभिमानी ऊस तोडणी-वहातूक संघटनेचे अध्यक्ष श्री. उमेश मेलगे तसेच खानापूर तालुका समिती सदस्य रामू कुप्पटगिरीकर उपस्थित होते.

२९ सप्टेंबरच्या आंदोलनानंतर १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

Advertise…………


101
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!