हलगेकरांकडून राज्योत्सवाचे गुणगान! मराठी संस्कृतीचा विसर? 


हलगेकरांकडून राज्योत्सवाचे गुणगान! मराठी संस्कृतीचा विसर? 

आमदारांचा म.ए. समितीकडून तीव्र निषेध; जि.प., ता.प. निवडणुका स्वबळावर लढवण्याचा एकमुखी ठराव

खानापूर: राजू कुंभार

खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी १ नोव्हेंबर राज्योत्सवाच्या बैठकीसंदर्भात सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त लिखाणाचा  खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत जोरदार निषेध नोंदवण्यात आला. “राज्यत्सव हा खानापूर तालुक्याची संस्कृती आणि मानबिंदू वाढवणारा उत्सव आहे,” या आमदारांच्या विधानाने सीमाभागातील मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळले असून हा मराठी संस्कृतीचा अपमान आहे, असा घणाघाती आरोप तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे.

तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा  एकमुखी ठराव संमत करण्यात आला.

बैठकीतील प्रमुख निर्णय आणि ठराव:

काळा दिन पाळण्याचे आवाहन: १ नोव्हेंबर रोजी राजा शिवस्मारक भवन (माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृह) येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत दंडाला काळ्या फिती बांधून केंद्र व राज्य सरकारविरोधात धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. सीमावासीयांनी हा ‘काळा दिन’ गांभीर्याने पाळावा, असे आवाहन करण्यात आले.

गद्दार नगरसेवकांचा निषेध, स्वाभिमानी नगरसेवकांचे अभिनंदन: बेळगाव महानगरपालिकेत ‘बेळगाव कर्नाटकचेच’ असा ठराव मंजूर करणाऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या नगरसेवकांचा तीव्र निषेध करण्यात आला. तर, या ठरावाला विरोध करून सभात्याग करत मराठी बाणा दाखवणारे म.ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजीराव मंडोळकर व सौ. वैशाली भातकांडे यांच्या अभिनंदनचा ठराव संमत झाला.

शेतकऱ्यांचे प्रश्न व रस्ते आंदोलन: उसाला प्रतिटन ५ हजार रुपयांचा दर जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच तालुक्यातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन दिले असून, वेळेत काम न झाल्यास तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी: एसआयआरच्या (SIR) नावाखाली १३ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळून हक्क हिरावून घेतल्याचा ठपका ठेवत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधाचा ठराव करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

कामगिरीची दखल: पुणे विभाग समितीचे ६ महिन्यांतील सातत्यपूर्ण कार्य आणि सीमाभागातील बिदर, भालकी, औराद, संतपूर येथे काढण्यात आलेल्या ‘मराठी सन्मान यात्रे’ची विशेष दखल घेऊन कौतुक करण्यात आले.

मूळ प्रवाहात परतण्याचे आवाहन

अध्यक्षीय भाषणात गोपाळराव देसाई यांनी, “जे कार्यकर्ते किंवा नेते राष्ट्रीय पक्षात गेले आहेत किंवा तटस्थ आहेत, त्यांनी पुन्हा म.ए. समितीच्या मूळ प्रवाहात सामील होऊन संघटना बळकट करावी. सीमाप्रश्न सुटेपर्यंत सर्वांनी एकजूट दाखवावी,” असे आवाहन केले.

या बैठकीस माजी आमदार दिगंबर पाटील, माजी सभापती मारुती परमेकर, माजी जि.प. सदस्य विलास बेळगावकर, राजाराम देसाई, धनंजय पाटील, वसंत नावलकर, रमेश धबाले, पुंडलिक पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, मुरलीधर पाटील, यांच्यासह संजीव पाटील, रवींद्र शिंदे, बाबुराव पाटील, जयसिंग पाटील, प्रकाश चव्हाण, मोहन गुरव आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी मानले.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!