स्कोडा सर्व्हिस सेंटर’ आणि ‘राष्ट्रीय ग्राहक मंच’च्या नावाने सायबर भामट्यांचा गंडा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
गडहिंग्लज प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.
केवळ ५ रुपये फॉर्म फी भरण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याला तब्बल ५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार गडहिंग्लज येथे उघडकीस आला आहे. ऑनलाईन भामट्यांच्या या जाळ्यात गडहिंग्लज येथील ज्वेलर्स व्यावसायिक अमर संगाप्पा दड्डी (वय ५०) हे अडकले आहेत.
नेमका प्रकार काय घडला?
२८ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे पावणेदोनच्या सुमारास अमर दड्डी हे घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअॅप कॉल आला. समोरील अज्ञात व्यक्तीने ‘स्कोडा सर्व्हिस सेंटर’मधून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ‘राष्ट्रीय ग्राहक मंचावर (नॅशनल कन्झ्युमर फोरम) तक्रार नोंदवण्यासाठी केवळ ५ रुपये शुल्क आहे’, असे सांगून दड्डी यांना एक बनावट लिंक पाठवण्यात आली.
त्या अज्ञात व्यक्तीने दड्डी यांना ती लिंक उघडण्यास सांगून पुढे प्रक्रिया करण्यास लावली. लिंकवर क्लिक केल्यानंतर काही वेळातच अमर दड्डी यांच्या गडहिंग्लज येथील युनियन बँकेच्या चालू खात्यातून, त्यांच्या कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय ५ लाख रुपये परस्पर लांबवण्यात आले.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अमर दड्डी यांनी तातडीने गडहिंग्लज पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३१ ऑगस्ट रोजी संबंधित मोबाईल क्रमांक धारक अज्ञात सायबर भामट्याविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास गडहिंग्लज पोलीस करत आहेत.


