नागरिकांचा संताप सार्वजनिक विकास कामांचा विळखा; सांडपाण्याच्या निचऱ्याअभावी प्रवाशांसह एसटी कर्मचारी त्रस्त. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.
नेसरी प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

नेसरी येथील मुख्य बस स्थानक परिसरात सुरू असलेल्या रस्ते व गटारीच्या अपूर्ण कामांमुळे प्रवाशांना, एसटी कर्मचाऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवल्याने आणि गटारींचे काम अर्धवट सोडल्याने परिसरात सांडपाणी साचून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असून, संबंधित यंत्रणेने तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी नेसरीकरांकडून होत आहे.
बस स्थानक परिसर समस्यांच्या फेऱ्यात
नेसरी येथे सध्या रस्ते विकास प्रकल्पांतर्गत गटारींची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे अनेक ठिकाणी ही कामे अपूर्ण राहिली आहेत. विशेषतः बस स्थानकातील कॅन्टीन आणि वाहतूक नियंत्रण कक्षासमोर सांडपाणी तुंबल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कॅन्टीनमध्ये येणाऱ्या नागरिकांना या दूषित पाण्यातून मार्ग काढत ये-जा करावी लागत आहे, तर वाहतूक नियंत्रण कक्षात duty वर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतुकीस अडथळा आणि प्रवाशांचे हाल
रस्त्याचे काम सुरू असताना परिसर अस्ताव्यस्त खोदून ठेवल्याने आणि गटारींमधून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने बस स्थानक परिसरात कमालीची अस्वच्छता निर्माण झाली आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या प्रतिमेच्या बाजूने वळण घेताना एसटी बसचालक तसेच इतर वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. विकासकामे करताना रस्ते विकासाबरोबरच सांडपाण्याचे योग्य नियोजन आणि वाहतुकीची सुसज्ज व्यवस्था करणे गरजेचे असताना, कामांमधील संथ गती व विस्कळीत नियोजनामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

