नंदगडात म. ए. समितीकडून महामेळाव्याची जनजागृती; ‘चलो बेळगाव’चा नारा
राजू कुंभार: नागुर्डा
येत्या बुधवार, दि. २ डिसेंबर २०२६ रोजी बेळगाव येथे होणाऱ्या सीमावासियांच्या निषेधात्मक महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने नंदगड परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून पत्रके वाटून ‘चलो बेळगाव’चा नारा देत मराठी भाषिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

कर्नाटक सरकारने बेळगावावर आपला हक्क सांगण्यासाठी २००६ पासून येथे हिवाळी अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा खटला प्रलंबित असतानाही हे अधिवेशन भरवून मराठी भाषिकांवर अन्याय केला जात असल्याची भावना सीमावासियांमध्ये आहे. याच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता निषेधात्मक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा महामेळावा धर्मवीर संभाजी चौक, संभाजी उद्यान शहापूर, व्हॅक्सिन डेपो मैदान किंवा सरदार हायस्कूल मैदान यांपैकी एका ठिकाणी पार पडणार आहे.
खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजनसिंह सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, खजिनदार संजीव पाटील, माजी सभापती मारुतीराव परमेकर, सहचिटणीस रणजीत पाटील आणि उपखजिनदार पांडूरंग सावंत आदी पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील तमाम मराठी बांधवांनी आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि एकजुटीचे दर्शन घडवण्यासाठी या महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
Advertise

Advertise


