मामासाहेब लाड विद्यालयात टप्पा दोनच्या उद्घाटनासह ‘ऑक्सिजन कॉर्नर’चेही उद्घाटन.
उपसंपादक: श्री स्वप्निल कुंभार. (चंदगड, आजरा, गडहिंग्लज)
ढोलगरवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर : दि महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमी संचलित महादेवराव बी. एड. कॉलेज, तुर्केवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर यांच्या अंतर्गत शालेय आंतरवासिता कार्यक्रम टप्पा दोनचा उद्घाटन समारंभ मामासाहेब लाड विद्यालय, ढोलगरवाडी येथे शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक एम. वाय. पाटील सर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून सावित्रीबाई फुले गट क्रमांक एकचे मार्गदर्शक एम. आर. मुल्ला सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छात्र अध्यापिका शैला कांबळे यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या ‘ऑक्सिजन कॉर्नर’चे उद्घाटन श्री. एम. एन. बोकडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्रमुख्याध्यापिका मेघा कांबळे यांनी केले. छात्र अध्यापिकांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्र पर्यवेक्षिका मयुरी हिशेबकर यांनी केले. त्यानंतर ग्रंथपाल एस. जी. पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात एम. वाय. पाटील सर यांनी आंतरवासिता कार्यक्रमासाठी छात्र अध्यापकांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच प्रमुख मार्गदर्शक एम. आर. मुल्ला सर यांनी छात्र अध्यापकांना मार्गदर्शन करून आंतरवासिता कालावधीत शैक्षणिक कार्यासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ओंकार पाटील यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व छात्र अध्यापकांचे आभार मानले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.




