लिंगायत समाजाला खुश खबर!
“अमृत” सर्व योजनात मिळणार संधी; आ. पाटील यांना यश
गडहिंग्लज: महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांतील अडचणी, विविध योजनांतील जाचक अटी तसेच समाजाच्या इतर प्रलंबित प्रश्नांबाबत येथील समाजबांधवांनी मागील आठवड्यात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. यावेळी आमदर शिवाजीराव पाटील यांच्या आश्वासनानंर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी समाजाच्या विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या.
या भेटीदरम्यान लिंगायत समाजाला आठ दिवसांत न्याय देऊ, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. त्यानुसार अवघ्या आठ दिवसांत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेच्या लक्षित गटामध्ये ‘हिंदू लिंगायत’ आणि ‘वीरशैव लिंगायत’ समाजाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे लिंगायत समाजातील युवक-युवतींना शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास तसेच विविध प्रगतीच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, लिंगायत समाजाच्या इतर मागण्यांबाबतही राज्य सरकार सकारात्मक असून, उर्वरित मागण्यांवर लवकरच समाजहिताचा निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल समस्त लिंगायत समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार शिवाजीराव पाटील यांचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.




