माणगाव-सोनारवाडी परिसरात सुरक्षेसाठी पिंजरा दाखल; ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने शोधमोहीम सुरु.
चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.
चंदगड तालुक्यातील माणगाव-सोनारवाडी परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून एका बिबट्याने तीव्र दहशत निर्माण केली असून तो सातत्याने वनविभागाला गुंगारा देत आहे. गंधर्वगड परिसराला लागून असलेल्या या भागात बिबट्याचा वावर असल्यामुळे आणि त्याचे अधूनमधून दर्शन होत असल्याने मानगाव परिसरातील जवळपास आठ गावांच्या शिवारात भीतीचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या बिबट्याने आतापर्यंत परिसरातील अनेक पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. एवढेच नव्हे तर, हुंबरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या बकरीच्या कळपाचासुद्धा या बिबट्याकडून पाठलाग करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी म्हणजेच चार दिवसांपूर्वी याच बिबट्याने मळतवाडी गावाच्या हद्दीत देखील प्रवेश केला होता.

या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभातर्फे तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. पाटणे वनपरिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल शीतल पाटील आणि वनपाल जॉन्सन डिसोजा यांच्या मार्गदर्शनाखाली मानगाव-सोनारवाडी मार्गावरील मालकीच्या शिवारात त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चंदगड आणि पाटणे वनपरिक्षेत्राची यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली असून, बिबट्याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथील विशेष उच्च तंत्रज्ञानयुक्त ड्रोन कॅमेरा पथकाची देखील मदत घेतली जात आहे.

