
सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान हे कौतुकास्पद कार्य: धनश्री सरदेसाई
खानापूर / प्रतिनिधी :
विश्वभारती कला क्रीडा संघटना, खानापूर आयोजित चौथी सामुदायिक सभा, विद्यार्थी प्रबोधन, खेळाडू सन्मान, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सामाजिक गौरव कार्यक्रम रविवारी (दि. २७ सप्टेंबर २०२६) शिवस्मारक, खानापूर येथे अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या भाजप नेत्या सौ. धनश्री कर्णसिंह सरदेसाई (जांबोटीकर) यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “विश्वभारती संघटनेने खेळाडू, आदर्श शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करून समाजात जनजागृतीचे मोठे काम केले आहे. गावोगावी जाऊन योग्य व्यक्तींची निवड करून सत्कार करणे, ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे. या संघटनेचे कार्य असेच कायम चालू राहो, आमचा हातभार नेहमी राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. जी. गाडी सर होते. तर व्यासपीठावर श्री थॉमस डिसोजा, श्री अजित पाटील, श्री सिताराम सुतार, श्री बळीराम नंदनकर, श्री धर्माजी नंदनकर, श्री संतोष पाटील, श्री संजय पाटील, भर्मांनी पाटील, ज्योतिबा सुतार, ज्योतिबा अंधारे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते व खेळाडूंचा गौरव :
या कार्यक्रमात बेस्ट सामाजिक कार्यकर्ता अवॉर्डचे मानकरी श्री रणजीत पाटील (हलगा), श्री कृष्णा गुरव (शिरोली) आणि श्री लाडोबा राऊत (शिरोली) यांच्यासह अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच कर्नाटक राज्यस्तरीय खो-खो संघात निवड झालेल्या यडोगा गावच्या विद्यार्थिनींचा व वैयक्तिक खेळांमधील खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
नूतन कार्यकारिणी जाहीर :
कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करून सत्कार करण्यात आला.
यामध्ये:बेळगाव जिल्हा क्रीडा कार्याध्यक्ष प्रमुख: श्री ज्योतिबा पाटील (गरबेन हट्टी)
* सेक्रेटरी: सौ. रितू निलजकर
* खानापूर तालुका कार्याध्यक्ष: श्री विनोद गुरव
* लोकोत्सव कार्याध्यक्ष: सौ. रमाका हनंबर
* लोंढा भाग कार्याध्यक्ष: श्री दीपक केसरकर
* हलगा भाग कार्याध्यक्ष: श्री पुंडलिक कामती
* जांबोटी भाग कार्याध्यक्ष: श्री श्रीपाद सर
विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रबोधन :
पुणे येथून आलेले प्रमुख वक्ते श्री गितन दिंडे यांनी विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन केले. “जीवनात यश-अपयश येतच असते, त्याला घाबरून न जाता सामोरे गेले पाहिजे. आत्महत्या हे महापाप आहे,” असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना धीर दिला. तसेच “शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याला आपण जपले पाहिजे आणि त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांविषयी कळकळ व्यक्त केली.
उपस्थित सर्व पाहुण्यांनी विश्वभारती कला क्रीडा संघटनेच्या जनजागृतीच्या कामाची प्रशंसा करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुवर्य तमन्ना गुरव सर यांनी केले, तर कार्यक्रमाची शिस्त गुरुवर्य परब सर यांनी सांभाळली. शेवटी संघटनेचे अध्यक्ष माजी सैनिक अनिल देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला विद्यार्थी, खेळाडू, शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertise…..




