
उद्या शिवस्मारकात समितीचे उपोषण आणि निषेध सभा
राजू कुंभार: खानापूर
उद्या दि.1 नोव्हेंब काळ्या दिना निमित्ताने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कडून शिवस्मारकात लाक्षणिक उपोषण आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात होऊन दुपारी 12 नंतर निषेध सभा होईल. दरम्यान तालुक्यातील सीमा सत्याग्रही आणि युवा कार्यकर्ते आपले विचार मांडतील.
निवडणुका आणि राजकीय अस्तित्वाची चर्चा
आगामी तालुका, जिल्हा पंचायत तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सभेत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठी माणसाची खरी ताकद दाखवण्यासाठी राजकीय अस्तित्व सिद्ध करणे अत्यंत गरजेचे असल्याने, उद्याच्या निषेध सभेत प्रामुख्याने याच मुद्द्यावर खल होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, चळवळीपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात कसे आणायचे, याबाबत गंभीरूरित्या विचारविनिमय केला जाणार आहे.
दरम्यान चळवळी पासून दूर झालेले कार्यकर्ते पुन्हा प्रवाहात कसे येतील यावर विचार विनियम होईल. अनेकांनी म. ए समितीच्या नावाने लाभाची राजकीय पदे भोगली आहेत. मात्र आता ते इतर राष्ट्रीय पक्षांच्या नादी लागलेत. किमान जनाची नाही मनाची तरी लाज ठेऊन उद्याच्या काळ्या दिना निमित्ताने ते पुन्हा प्रवाहात येतील का? की राष्ट्रीय पक्षांचे चप्पल चाटतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील तमाम मराठी भाषिकांनी आपली स्वातंत्र्य विचारधारा बाजूला ठेऊन एका दिवसासाठी तरी माय मराठीसाठी उद्याच्या लाक्षणिक उपोषणात सहभागी व्हावे, व मराठी अस्तित्व दाखवावे,असे आवाहन तालुका अध्यक्ष गोपाळ देसाई आणि सचिव आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

