खानापुरात जारकिहोळी समर्थकांचा एल्गार
खानापूर : राजू कुंभार
कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी व त्यांचा निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले. या कारवाईवरून खानापुरतील त्यांच्या समर्थकांनी निषेध रॅली काढून तीव्र संताप व्यक्त केला.
येथील कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निषेध मोर्चाला सुरूवात केली. तसेच शिवस्मारक सर्कल येथे तीव्र निषेध व्यक्त करत केंद्र शासनाचा धिक्कार केला.
भाजप सरकार राजकीय द्वेषापोटी आणि विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ED, सीबीआय आणि आयटी (IT) यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहे. नेत्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न: आंदोलकांच्या मते, सतीश जारकिहोळी हे दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाचे मोठे आणि प्रभावशाली नेते आहेत. म्हणून त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली आहे असे मत कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या मोर्चाला मलेशी पोळ, पुट्टू हवनुरा,प्रवीण यादवाड,रोहित पोळ,मांतेश पत्रदारा,इरप्पा मादारा,मारुती नायक,रघु चालववादी,रामा मादारा,प्रकाशा मादारा, एन सी तळवार,शंकरा पाटील,कुबेर नायक,शंकर पाखरे ,भरमानी पाखरे ,किरण मोटर आदिंसह कार्यकर्ते उपस्थीत होते.

सतिश जारकिहोळी यांचा वाढत असलेला राजकीय प्रभाव आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्यानेच भाजपकडून हा कट रचण्यात आला आहे. असे मत किरण पाटील यांनी व्यक्त केले.




