ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार!
पक्षीय चिन्हावर होतील निवडणुका?
सरकार नियुक्त ग्रा प सदस्य निवडले जातील?
५,८६४ ग्रामपंचायतींची तयारी पूर्ण; आरक्षण-प्रभाग रचना अंतिम, आता राजकीय डावपेचांना वेग
खानापूर : राजू कुंभार
कर्नाटकातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील तब्बल ५,८६४ ग्रामपंचायतींची प्रभाग पुनर्रचना आणि सदस्यांच्या जागांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिल्याने आता निवडणुकांचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.सरकारने आपली प्रशासकीय तयारी पूर्ण केल्याचे स्पष्ट केल्यानंतर निवडणुकीचे पुढील पाऊल उचलण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आली आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांत गावागावात राजकीय मोर्चेबांधणी, गटबाजी आणि उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होण्याची शक्यता आहे.
आरक्षणाची घोषणा होताच इच्छुकांची धावपळ होणार
ग्रामपंचायत निवडणुकीतील आरक्षण आणि प्रभाग रचना हा ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. कोणता प्रभाग कोणासाठी राखीव राहणार, कोणत्या गटाला कोणत्या जागेवर संधी मिळणार आणि विद्यमान राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे आता गावपातळीवरील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. आरक्षणाच्या गणितावर अनेक इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार असल्याने पडद्यामागील राजकीय हालचालींनाही वेग येण्याची चिन्हे आहेत.
हायकोर्टात सरकारची भूमिका स्पष्ट
राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून ५,८६४ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती राज्य निवडणूक आयोगाला दिल्याचेही सरकारने सांगितले.यावर न्यायालयाने आवश्यक प्रशासकीय काम सरकारने पूर्ण केले असल्याचे नमूद करत, आता पुढील आवश्यक कार्यवाही करणे हे राज्य निवडणूक आयोगाचे काम असल्याचे स्पष्ट केले.या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.
ईव्हीएमऐवजी मतपत्रिका; गावागावात राजकीय रणशिंग?
आगामी ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदानाची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध बॅलेट बॉक्सची तपासणी, दुरुस्ती आणि पडताळणी करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्याने निवडणूक यंत्रणा सज्ज होत असल्याचे चित्र आहे.
निवडणूक आली की गावागावातील समीकरणे बदलणार!
ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून आगामी विधानसभा आणि इतर राजकीय समीकरणांची रंगीत तालीम मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीत कोणता गट वरचढ ठरतो, कोणाचे वर्चस्व वाढते आणि कोणाला राजकीय धक्का बसतो, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष राहणार आहे.
एकूणच, ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा होताच ग्रामीण कर्नाटकातील राजकीय पटावर हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
पक्षीय चिन्हावर होतील निवडणुका?
तालुक्यातील एका राजकिय पक्षाकडून ग्राम पंचायत उमेदवारी साठी गाव खेड्यातील आपल्या कार्यकर्त्यांची चाचपणी केली जात असल्याची चर्चा आहे. तसेच नगर पंचायती प्रमाणे सरकार नियुक्त ग्रा प सदस्य निवडले जातील अशीही चर्चा रंगू लागली आहे .





