कुसमळी प्रकल्पावरून भाजप कार्यकर्त्यांकडूनच कानउघडणी


कुसमळी प्रकल्पावरून भाजप कार्यकर्त्यांकडूनच कानउघडणी

‘घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा!’; सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे जांबोटी भागातच पाण्यासाठी वणवण.

खानापूर: राजू कुंभार 

“पिढ्यानपिढ्या ज्या मलप्रभा नदीने संपूर्ण परिसराची तहान भागवली, त्याच नदीचे पाणी आज मोठ्या प्रकल्पाच्या नावाने बेळगाव ग्रामीण भागासाठी पळवले जात आहे. मात्र, ज्यांच्या उराशी हा प्रकल्प उभारला गेला, त्या जांबोटीकरांचे गळे मात्र कोरडेठाक पडले आहेत!” – कुसमळी येथील मलप्रभा नदीच्या पाणी प्रकल्पावरून जांबोटी महसूल विभागात आयोजित प्रजासेवा आंदोलनात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनीच आपल्याच पक्षाच्या आमदारांची आणि तालुका प्रशासनाची उघड्यावर कानउघाडणी केल्याने सत्ताधाऱ्यांचे चांगलेच वाभाडे निघाले आहेत.

जांबोटी ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष व भाजपचे स्थानिक कार्यकर्ते श्री. सुनील देसाई यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रशासनाला दोन प्रमुख मागण्यांचे निवेदन धडकवण्यात आले.

घरात अंधार अन् दुसऱ्याला प्रकाश!

कुसमळी पाणी प्रकल्पाच्या नावाखाली मोठा थाटमाट करत बेळगावच्या ग्रामीण भागाला पाणी देण्याचे राजकारण करणाऱ्या प्रशासनाला आणि आजी माजी लोकप्रतिनिधीना स्थानिक जनतेचा पुरता विसर पडला आहे.

जांबोटी भागातील आसपासच्या खेड्यांना तात्काळ स्वतंत्र पाणीपुरवठा प्रकल्प उभारून येथील जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावा अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे.

दुष्काळ जाहीर करण्यातही प्रशासनाची टाळाटाळ

पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्यामुळे खानापूर तालुक्यातील शेतकरी अक्षरशः देशधडीला लागला आहे. पिके करपून गेली आहेत, तरीही तालुक्याला ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करून शेतकऱ्यांना शासकीय मदत आणि सवलती देण्याबाबत प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सुस्तच आहेत. ‘प्रजासेवा’ आंदोलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्यांची ही कोंडी उघड्यावर आणत, खानापूर तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी दुसरी खणखणीत मागणी करण्यात आली.

स्वतःच्याच पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा  आमदारांना आणि प्रशासनाला धारेवर धरतात, तेव्हा प्रशासकीय हलगर्जीपणा आणि आमदारांची निष्क्रीयता किती टोकाला पोहोचली आहे हेच सिद्ध होते. आता तरी झोपलेले प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होऊन जांबोटीकरांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेणार, की जनतेला पाण्यासाठी आणखी रस्त्यावर उतरावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जांबोटीत कार्यालय आहे, अधिकारी कुठे?, असा सवाल यावेळी माजी ग्रा प अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी उपस्थित केला.

पश्चिम भागातील नागरिकांची सोय व्हावी म्हणून जांबोटीत उपतहसीलदार कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या वर्षभरापासून उपतहसीलदार व सर्कल अधिकारी जांबोटीत नियमित उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.

महसूलविषयक कामांसाठी नागरिकांना पुन्हा खानापूरला हेलपाटे मारावे लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. ‘शेतीची कामे सोडून खानापूरला किती वेळा जायचे? मग जांबोटीत कार्यालयाचा उपयोग काय?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांनी देखील यावेळी भागाच्या समस्यांचा पाढा वाचला.

Advertise


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!