फोक्सवॅगनची लुना दुचाकीला जोरदार धडक; शेवाळे गावच्या ७५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार
हेरे-मोटनवाडी रोडवरील हेरे गावाजवळ असलेल्या नदीच्या पुलाजवळ शनिवारी (दि. १७) सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास फोक्सवॅगन कार व लुना दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात शेवाळे (ता. चंदगड) येथील शंकर विष्णू गावडे (वय ७६) यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 02 CW 9571 क्रमांकाची फोक्सवॅगन कार तिलारी परिसरातून परतत असताना हेरे-मोटनवाडी मार्गावर आली होती. याचवेळी बाजार आटोपून लुना दुचाकीवरून घरी परतणाऱ्या शंकर विष्णू गावडे यांच्या दुचाकीला कारने नदीच्या पुलाजवळ जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दुचाकीसह गावडे यांना रस्त्याच्या बाहेर फरफटत नेण्यात आले, तर कारही रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
अपघातातील फोक्सवॅगन कारमधील तिन्ही तरुण वडगाव, बेळगाव येथील असल्याची माहिती मिळाली आहे. ते तिलारी परिसरात गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान हा अपघात घडला. सदर तरुणांविरुद्ध चंदगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे

मृत शंकर विष्णू गावडे हे शेवाळे गावचे रहिवासी असून ते शेतकरी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व एक नातू असा परिवार आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.


