तुमच्या कॉलेजमध्ये तर नाहीत ना ‘बोगस प्रोफेसर’?
अतिथी प्राध्यापकांना महाविद्यालयीन शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस.
बेंगळुरू: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आता आपल्याला लेक्चर देणारे प्राध्यापक ओरिजनल की डुप्लिकेट शोधण्याची वेळ आली आहे.नुकताच अतिथी प्राध्यापकांना महाविद्यालयीन शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याने शिक्षव्यवस्थेतील काळा बाजार उघडा पडणार आहे.
महाविद्यालयीन शिक्षण विभागाने नुकत्याच केलेल्या पडताळणीमध्ये सुमारे 240 अतिथी प्राध्यापकांनी बनावट पीएच.डी. प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश विभागाने यापूर्वीच दिले आहेत.
बनावट पीएच.डी. पदवी प्रमाणपत्रांच्या आधारे नियुक्ती मिळविलेल्या प्रकरणी महाविद्यालयीन शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली असून, राज्यातील 452 अतिथी प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.या संदर्भात माहिती देताना महाविद्यालयीन शिक्षण विभागाचे आयुक्त म्हणाले की, ज्या 452 अतिथी प्राध्यापकांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांनी आपली मूळ शैक्षणिक कागदपत्रे व त्यासंबंधीचे पुरावे विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.
“विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास, संबंधित अतिथी प्राध्यापकांवर नियमानुसार योग्य ती शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल,” व फौजदारी खटले दाखल करण्यात येतील असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही. बनावट पदवी धारण करणाऱ्यांविरुद्ध शून्य सहनशीलतेचे (झिरो टॉलरन्स) धोरण अवलंबिण्यात येणार असल्याचे विभागाने नमूद केले आहे.





