शिक्षक बसवराज येल्लुर यांना कायदेशीर नोटीस!
दिव्यांगाचा पत्रकार परिषदेत बदनामी केल्याचा आरोप
खानापूर : तालुक्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या कथित मद्यपान प्रकरणावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात पत्रकार परिषदेत बदनामी केल्याचा आरोप करत विलास गोविंद कवठणकर यांनी खानापूर तालुका सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा शिक्षक बसवराज मल्लाप्पा येल्लुर यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. ही नोटीस १७ ऑक्टोबर २०२६ रोजी बेळगाव येथून पाठविण्यात आली आहे. अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपण दिव्यांग असल्याची जाणीव असतानाही पत्रकार परिषदेत आपल्याची अवमानकारक पद्धतीने चर्चा करण्यात आली, असा दावाही त्यांनी नोटिशीत केला आहे. या प्रकारामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा दुखावली असून, संबंधितांविरोधात न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करण्याबाबत कायदेशीर इशारा देण्यात आला आहे.
नोटीसमधील माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास जांबोटी येथील संगीता ढाब्यावर सरकारी वाहन क्रमांक KA-22/G-1050 दिसले. त्यानंतर ढाब्यावर गेल्यानंतर खानापूरचे तहसीलदार दुंडप्पा कोम्मार, उपतहसीलदार एस. के. तंगोळी आणि जांबोटीचे महसूल निरीक्षक रमेश कोलकार हे मद्यपान करत असल्याचे दिसल्याचा दावा कवठणकर यांनी नोटिशीत केला आहे. (नुकताच संबंधितांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे)
यावेळी त्यांच्यासोबत कन्नड दैनिक ‘प्रजा नेरळू’चे संपादक सागर कृष्णा कोलेकर हेही उपस्थित होते. संबंधित घटनेचे छायाचित्रण केल्याचा उल्लेखही नोटिशीत करण्यात आला आहे. ही घटना सरकारी कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत घडल्याचा आरोप नोटीस देणाऱ्याने केला आहे.
दरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता खानापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पत्रकार परिषद घेण्यात आल्याचा उल्लेख नोटिशीत आहे. या पत्रकार परिषदेत आपल्याबाबत चुकीची माहिती देऊन प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्यात आल्याचा आरोप कवठणकर यांनी यावेळी केला आहे.
महसूल विभागातील प्रकरणाला नवे वळण
सरकारी अधिकाऱ्यांच्या कथित मद्यपानाच्या आरोपांपासून सुरू झालेला हा विषय आता पत्रकार परिषद आणि मानहानीच्या कायदेशीर इशाऱ्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी, संबंधित अधिकाऱ्यांची बाजू आणि नोटीस प्राप्त झालेल्या व्यक्तीचे स्पष्टीकरण याबाबत नोटिशीत माहिती उपलब्ध नाही.त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी संबंधित सर्व पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
टीप : ही बातमी कायदेशीर नोटिशीतील दाव्यांवर आधारित आहे. आरोप सिद्ध झालेले नाहीत.


