न्यू होरायझन स्कूलमध्ये दिवाळी कार्यशाळांचा रंगोत्सव; ८५० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!


आकाशकंदील निर्मिती, पणती रंगकाम आणि चित्ररंगभरण अशा तीन उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; कला विभागाचा स्तुत्य उपक्रम.

औरनाळ प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

 दिवाळी सणाचे औचित्य साधून न्यू होरायझन स्कूल, औरनाळ येथे आकाशकंदील बनवणे, मातीच्या पणत्यांचे रंगकाम आणि चित्ररंगभरण अशा तीन विविध कार्यशाळांचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. शाळेच्या चित्रकला विभागामार्फत आयोजित या उपक्रमात ८५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या कार्यशाळांचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून सौ. आरती पाटील उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सौ. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सौ. सुनीता पाटील म्हणाल्या, “दिवाळी सणामध्ये ज्या पद्धतीने आकाशकंदील संपूर्ण घर प्रकाशमान करतो, त्याचप्रमाणे मानवी अंगी असलेल्या विविध कला माणसाचे संपूर्ण जीवन प्रकाशमान करतात.” त्यांच्या या प्रेरणादायी विचारांनी कार्यशाळेला सुरुवात झाली.

आकाशकंदील निर्मितीत सातवी ते नववीच्या २३८ विद्यार्थ्यांचा सहभाग:

आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेत इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध साहित्यांचा कल्पकतेने वापर करून आकर्षक आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात सहभाग घेत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवले.

२५८ विद्यार्थ्यांनी चित्ररंगभरणातून खुलवले रंगविश्व:

इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्ररंगभरण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेमार्फत विद्यार्थ्यांना दिवाळीशी संबंधित विविध चित्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या रंगांची उधळण करत चित्रांमध्ये रंग भरले आणि आपल्या कल्पनाशक्तीला रंगरूप दिले. या उपक्रमात एकूण २५८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

४५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या हातून पणत्यांना मिळाली रंगसजावट:

इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मातीच्या

पणत्या रंगवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कलाशिक्षक श्री. स्वप्नील कुंभार यांनी विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विविध रंगांचा वापर करून पणत्यांना आकर्षक स्वरूप दिले. या कार्यशाळेत ४५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि कलेच्या माध्यमातून आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळावा, या उद्देशाने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कला विभागप्रमुख श्री. स्वप्नील कुंभार यांनी दिली.

याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री. आर. बी. लोखंडे, श्री. अमोल चोथे, सौ. रोहिणी खंदारे, सौ. शबाना मकानदार यांच्यासह अन्य शिक्षकांचे सहकार्य लाभले. 

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!