तहसील कार्यालयात डिजिटल फलक!


प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एकनाथ वाके यांचे निवेदन

चंदगड प्रतिनिधी: श्री स्वप्निल कुंभार.

        चंदगड तहसील कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी आणि प्रशासकीय कामकाजात स्पष्टता आणण्यासाठी ‘डिजिटल माहिती व शुल्क फलक’ उभारण्यात यावा, अशी मागणी मजरे शिरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ वाके यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

​तालुक्यातील ग्रामीण भागातून दररोज अनेक नागरिक उत्पन्नाचा दाखला, रहिवासी व जात प्रमाणपत्र, फेरफार नोंद यांसारख्या विविध महसुली कामांसाठी तहसील कार्यालयात येतात. शासनाने अनेक सेवा ऑनलाइन केल्या असल्या, तरी आवश्यक कागदपत्रे, अर्जाची अचूक पद्धत, कामाचा कालावधी आणि शासकीय शुल्क याबाबत सर्वसामान्यांना पुरेशी माहिती नसते. माहितीच्या अभावामुळे नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो.

​हे टाळण्यासाठी तहसील कार्यालयाच्या मुख्य आवारात एक मोठा डिजिटल स्क्रीन बसवण्यात यावा. या फलकावर प्रत्येक सेवेसाठी लागणारे अधिकृत शुल्क, कागदपत्रांची यादी आणि प्रक्रियेची माहिती अद्ययावत स्वरूपात प्रदर्शित केली जावी. यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष किती रक्कम भरायची आहे याची स्पष्ट कल्पना येईल आणि मध्यस्थांची गरज उरणार नाही.

​शासकीय योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचवणे ही काळाची गरज आहे. डिजिटल युगात ही माहिती डिजिटल पद्धतीनेच उपलब्ध करून दिल्यास प्रशासकीय कामात पारदर्शकता वाढेल आणि गैरसमज दूर होतील. त्यामुळे प्रशासनाने यावर तत्काळ निर्णय घेऊन डिजिटल फलक उभारावा, अशी अपेक्षा एकनाथ वाके यांनी व्यक्त केली आहे.


102
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!