
खानापुरातील सरकारी तलाव गिळण्याचा भूमाफियांची डाव
न्यायालयात दावा असतानाही भरदिवसा चालवला जेसीबी
खानापूर (प्रतिनिधी):
स्वतः महसूल प्रशासनाने ज्या जागेला मूळ सरकारी ‘ब-खराब तलाव’ असल्याचे मान्य करून अहवाल दिलेला आहे आणि ज्या जागेचा वाद थेट दिवाणी न्यायालय, जिल्हा न्यायालय ते उच्च न्यायालयापर्यंत न्यायप्रविष्ट आहे, अशा कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान सरकारी जागेवर भरदिवसा जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने काम सुरू करून अतिक्रमण करण्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला आहे.
न्यायालयात प्रकरणे चालू असताना सुरू असलेल्या या मनमानी कारभारामुळे खानापूर शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तीन न्यायालयांमध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट:
खानापूर शहरातील आर.एस. क्र. ४९/ब मधील ०० एकर – ३६ गुंठे जागेच्या मालकी हक्काबाबत आणि तलावाच्या अस्तित्वाबाबत सध्या एकाच वेळी तीन न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. यामध्ये:
खानापूर दिवाणी न्यायालयात (Civil Court) O.S. No. 169/2025,
बेळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात M.A. No. 01/2026,
तसेच मा. उच्च न्यायालय (धारवाड खंडपीठ) येथे खटले प्रलंबित आहेत.
कायद्याचा मूलभूत नियम असा आहे की, जेव्हा एखादी जागा न्यायप्रविष्ट (Sub-judice) असते, तेव्हा तेथे जैसे थे परिस्थिती ठेवणे बंधनकारक असते. मात्र, कायद्याची आणि न्यायालयाची कोणतीही पर्वा न करता काल दिनांक २८ ऑक्टोबर रोजी अचानक जेसीबी व ट्रॅक्टर आणून जागेचे सपाटीकरण आणि बांधकाम पूर्वतयारी सुरू करण्यात आली.
तहसीलदारांच्या अहवालातच ‘सरकारी तलाव’ स्पष्ट:
विशेष म्हणजे खानापूरच्या तहसीलदारांनी ऑगस्ट २०२४ मध्ये मा. जिल्हाधिकारी, बेळगाव यांना पाठवलेल्या अधिकृत अहवालात स्पष्ट नमूद केले होते की, मूळ सर्व्हे रेकॉर्डनुसार सदर जागा ही ‘ब-खराब तलाव’ आहे. मागील काळात या तलावाच्या जागेवर चुकीच्या पद्धतीने अकृषिक (NA) आदेश व पट्टण पंचायतीत बेकायदेशीर उतारे तयार करण्यात आले होते. या अहवालात संबंधित नियमबाह्य उतारे तत्काळ रद्द करून सदर जागा पुन्हा सरकारी पाहणी पत्रकात नोंदविण्याची आणि दोषींवर विभागीय चौकशी करण्याची स्पष्ट शिफारस करण्यात आलेली आहे.
कर्नाटक तलाव संवर्धन कायद्याची उघड पायमल्ली:
‘कर्नाटक तलाव संवर्धन आणि विकास प्राधिकरण अधिनियम, २०१४’ तसेच शासनाच्या परिपत्रकांनुसार कोणत्याही परिस्थितीत सरकारी तलावांचे अस्तित्व नष्ट करता येत नाही किंवा त्यावर अतिक्रमण करता येत नाही. ३६ गुंठ्यांपैकी शिल्लक असलेल्या सुमारे १८ गुंठे मोकळ्या सरकारी जागेवर डोळा ठेवून भूमाफियांनी हे काम सुरू केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे.
जागा ताब्यात घेऊन कारवाई करा – नागरिकांची मागणी:
“स्वतः महसूल अधिकाऱ्यांनी जागा सरकारी असल्याचे मान्य केलेले असताना आणि प्रकरणे कोर्टात प्रलंबित असताना जर दिवसाढवळ्या जेसीबी फिरवून काम सुरू होत असेल, तर प्रशासनाचे अस्तित्व उरले आहे का?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे. संबंधित महसूल व पोलीस प्रशासनाने तत्काळ जागेवर धाव घेऊन सदर बेकायदेशीर काम तात्काळ बंद पाडावे, शिल्लक असलेली तलावाची सरकारी जागा स्वतःच्या ताब्यात घेऊन तिथे शासकीय फलक लावावा, अन्यथा कायद्याची भीती न उरलेल्या या भूमाफियांचे मनोबल अधिकच वाढेल, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे.
Advertise


