चंदगड तालुक्यावर आता ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर!


पेट्रोल पंप, मॉल, बीअर बार, हॉटेल, मंदिरांसह गावोगावी CCTV यंत्रणेचे जाळे; कानूर खुर्द व कानूर बुद्रुकमध्ये १० कॅमेरे कार्यान्वित!

चंदगड प्रतिनिधी : श्री स्वप्निल कुंभार.

चंदगड : तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चंदगड पोलिसांनी व्यापक CCTV सुरक्षा मोहीम हाती घेतली आहे. पेट्रोल पंप, मॉल, बीअर बार, हॉटेल, मंदिरे आणि अन्य महत्त्वाच्या आस्थापनांमध्ये बसविण्यात आलेल्या CCTV यंत्रणेचा आता सार्वजनिक सुरक्षेसाठीही प्रभावी वापर करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत संबंधित आस्थापनांमधील CCTV कॅमेऱ्यांपैकी किमान दोन कॅमेरे मुख्य रस्त्यावरील ये-जा करणारी वाहने, वाहनांचे क्रमांक आणि रस्त्यावरील हालचाली स्पष्टपणे टिपतील अशा पद्धतीने लावण्याचे आवाहन चंदगड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलीस पाटलांच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती!

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी चंदगड पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटलांची बैठक घेऊन गावातील सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे बसविण्याबाबत मार्गदर्शन केले होते. प्रत्येक पोलीस पाटलाने गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्तरीय कमिटीशी संपर्क साधून गावातील महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या होत्या.

कानूर खुर्द व कानूर बुद्रुकमध्ये १० CCTV कॅमेरे!

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कानूर खुर्द व कानूर बुद्रुक या गावांमध्ये बेळगाव-विहंगुर्ला मार्गावरील अवैध दारू वाहतूक तसेच इतर गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने एकूण १० CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

हे कॅमेरे बसविण्यासाठी ग्रामपंचायत कानूर खुर्दचे सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीच्या निधीतून तातडीने आर्थिक तरतूद करण्यात आली. तसेच श्री गुरुकृपा काजू इंडस्ट्रीजचे श्री. गुरुनाथ बल्लाळ यांनीही मोलाचे सहकार्य केले.

या उपक्रमामुळे गावातील महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष ठेवणे, संशयास्पद हालचालींची माहिती मिळविणे आणि गुन्हे घडल्यानंतर तपासाला मदत होणे शक्य होणार आहे.

चंदगड तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून गोवा व कर्नाटक राज्यांच्या सीमेलगत असल्याने अवैध वाहतूक, गुन्हेगारी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी CCTV यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याच अनुषंगाने तालुक्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीही CCTV कॅमेरे बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.

“गाव सुरक्षित, रस्ते सुरक्षित आणि नागरिक सुरक्षित” हे उद्दिष्ट समोर ठेवून चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने लोकसहभागातून सुरक्षिततेचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमात सर्व ग्रामपंचायती, व्यावसायिक, आस्थापना चालक आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले आहे.


183
कृपया वोट करा

ग्रामदूतच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!